VIDEO: विमानाला कारची धडक थोडक्यात टळली; Indigo Plane सोबतची घटना
Delhi Airport | (credit- ANI)

‘गो फर्स्ट' (Go First) नावाच्या विमान वाहतूक कंपनीची एक कार मंगळवारी (2 ऑगस्ट) दिल्ली विमानतळावर (Delhi Airport) चक्क ‘इंडिगो' (Indigo) कंपनीच्या ‘ए320नियो' या विमानाखाली आली. कार विमानाच्या ‘नोज व्हील'ला (पुढची चाके) जाऊन धडकणार इतक्यात वेळीच प्रसंगावधान दाखवले गेल्याने विमान आणि कारची धडक थोडक्यात टळली. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने या प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विमान वाहतूक उद्योगाशी संबंधीत सूत्रांनी म्हटले की, इंडिगो कंपनीच्या विमानाला कोणतेही नुकसान पोहोचले नाही.

प्राप्त माहितीनुसार, इंडिगो विमान VT-ITJ स्टँड नंबर 201 वर उभे होते. एक ग्रो ग्राउंड मारुती, स्विफ्ट डिजायर वाहन या विमानाच्या अगदी जवळ आले. ते इतके जवळ आले की आता हे वाहन आणि विमानाचे नोज व्हिल यांच्यात धडक होते की काय अशी स्थिती निर्माण झाली. मात्र दोघांमध्येही धडक झाली नाही. अपघात टळला. कोणालाही दुखापत आणि नुकसान पोहोचले नाही.

ट्विट

कार चालकाने मद्य अथवा इतर कोणत्या नशील्या पदार्थाचे सेवन केले होते काय? याबाबत चौकशी सुरु आहे. त्याची वैद्यकीय चाचणी केली असता त्याने अशा प्रकारे कोणत्याही पदार्थाचे सेवन केले नसल्याचे पुढे आले. ही घटना घडल्यानंतर विमान निश्चित वेळेनुसारच आकाशात झेपावले.