Coronavirus: कोरोना व्हायरस रुग्णांच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या स्थानावर; रशियाला टाकले मागे, लवकरच पार करणार 7 लाख रुग्णांचा टप्पा
कोरोना व्हायरस (Photo Credit : Pixabay))

भारतामध्ये जेव्हा कोरोना व्हायरसचा (Coronavirus) पहिला रुग्ण आढळला होता, तेव्हा कोणी कल्पनाही केली नसेल की अवघ्या 4 महिन्यांमध्ये देशात हा विषाणू मोठ्या प्रमाणावर थैमान घालणार आहे. आता तर भारतात, कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. जगातील कोरोना रुग्णांच्या बाबतीत भारत सध्या तिसर्‍या क्रमांकावर पोहोचला आहे. याबाबतीत रविवारी भारताने रशियाला (Russia) मागे टाकले आहे. सध्याच्या घडीला जगात सर्वाधिक कोरोना संसर्गाची प्रकरणे अमेरिकेत (US) आहेत. जगातील महासत्ता असलेल्या या देशात 29 लाखाहून अधिक प्रकरणे आहेत. अमेरिकानंतर ब्राझील (Brazil), भारत आणि रशियाचा नंबर लागतो.

ब्राझीलमध्ये 15 लाखाहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. अमेरिकेत भारताच्या चार पट जास्त कोरोनाचे रुग्ण आहेत. ब्राझीलमध्ये भारतात जवळपास दुप्पट प्रकरणे आहेत. मृत्यूच्या बाबतीतसुद्धा जगात अमेरिका आणि ब्राझीलची अवस्था सर्वात वाईट आहे. Worldometers प्रमाणे भारतात सध्या 697,069 कोरोना संक्रमित रुग्ण आहेत. रविवारी भारतात सलग दुसर्‍या दिवशी सर्वाधिक कोरोना व्हायरस रुग्णांची नोंद झाली. आरोग्य मंत्रालयाच्या वतीने, दररोज सकाळी जारी केल्या जाणार्‍या आकडेवारीनुसार, आज सकाळी देशात गेल्या 24 तासांत 24,850 नवीन रुग्णांची नोंद झाली आणि 613 रुग्णांचा मृत्यू झाला. (हेही वाचा: मुंबईमध्ये आज 1,311 कोरोना विषाणू रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 84,125 वर)

सध्या अमेरिकेमध्ये 2,959,188 रुग्णांची नोंद झाली असून, 132,418 मृत्यूंची नोंद झाली आहे. ब्राझीलमध्ये 1,579,837 रुग्णांची नोंद झाली आहे व रशियामध्ये 681,251 रुग्णांची नोंद झाली आहे. रशियानंतर पेरू व स्पेन देशांचा नंबर लागतो. भारतामध्ये सध्या महाराष्ट्र राज्यात साव्रधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. महाराष्ट्रात आज 6,555 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर 125 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 2,6,619 वर पोहचली आहे. यापैकी 8,822 जणांचा मृत्यू झाला आहे.