COVID-19 Vaccine | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कोविड-19 लसी (Covid-19 Vaccine) संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. कोविड-19 लसीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या सर्वांसाठी ही माहिती अत्यंत दिलासादायक ठरेल. कोरोना लसीसंदर्भात भारतात सर्व आवश्यक तयारी सुरू आहेत आणि भारतात निर्मित लस प्रत्येक घरात पोचल्या पाहिजेत, त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे पंतप्रधान मोदी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या पायाभरणी कार्यक्रमात म्हणाले. लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी संपूर्ण भारत एकत्रितपणे पुढे येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन उपस्थित होते.

मोदी म्हणाले की, 2020 मध्ये कोरोना संसर्गामुळे निराशा निर्माण झाली होती. चिंतो होती. अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. पण 2021 आशा घेऊन येत आहे. लसीसंदर्भात आवश्यक सर्व तयारी सुरु आहे. भारतात तयार केलेली लस प्रत्येक महत्त्वाच्या घरात लवकरात लवकर पोहचायला हवी. यासाठी चे प्रयत्न अंतिम टप्प्यात आले आहेत.

कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी निष्काळजीपणा योग्य नाही, असा संदेशही त्यांनी दिला. तसंच त्यांनी "दवाई भी, कडाई भी" हा मंत्र देताना ते म्हणाले याचा अर्थ आता औषध घ्यावे लागेल आणि कठोर कारवाई देखील करावी लागेल. लस मिळाली याचा अर्थ असा नाही की सवलत मिळाली, हे देखील त्यांनी स्पष्ट केले. तसंच भारताने योग्य वेळी एकत्रितपणे पाऊले उचलली आणि त्यामुळे आज कोरोना विरुद्धच्या लढाईत देस अधिक चांगल्या स्थितीत आहे, असेही मोदी म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, ज्या देशात 130 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या आहे, दाट लोकवस्ती आहे. त्या देशात जवळपास एक कोटी लोकांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. तसंच या वर्षातील कठीण परिस्थितीने भारताची एकजूट दाखवून दिली. त्याचबरोबर पंतप्रधानांनी लाखो डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार, ड्रग स्टोअर्स आणि कोरोनाविरूद्ध लढ्यात योगदान देणार्‍या इतर आघाडीच्या कोरोना योद्धांचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले.