Uttar Pradesh: रक्षा बंधनासाठी भारत आणि नेपाळ सरकारने खुल्या केल्या सीमा; भावा-बहिणींच्या प्रेमापुढे नमले दोन्ही देशांचे सरकार
India & Nepal Border (Photo Credits: Twitter)

भारत (India) आणि नेपाळ (Nepal) मधील संबंध किती स्वरुपात घट्ट आहेत, हे सोमवारी (3 ऑगस्ट) रक्षाबंधनानिमित्त दिसून आले. या दिवशी रुपई डीहा सीमावरील शेकडो बहिणींनी सीमा पार राहणाऱ्या आपल्या भावांना राखी पौर्णिमेनिमित्त राखी बांधण्यासाठी केलेल्या आग्रहापुढे सरकारला नमते घ्यावे लागले. भावा बहिणीच्या या प्रेमापुढे कोरोना व्हायरस, हाय अलर्ट आणि दोन्ही सरकारमधील वाद विवाद या गोष्टी फिक्या पडल्या. दोन्ही देशांनी शेवटी हार मानून या बहिणींसाठी काही तासांसाठी सीमा खुली केली.

सशस्त्र सीमा दलाच्या 42 व्या तुकडीच्या कमांडेंट प्रविण कुमार यांनी मंगळवारी असे सांगितले की, कोविड-19 संकट आणि अयोध्या मंदिर भूमीपूजन यामुळे सीमेवर कडक पहारा सुरु आहे. परंतु, सोमवारी रक्षाबंधनच्या दिवशी रुपई डीहा सीमाच्या दोन्ही बाजूस शेकडो बहिणी हातात राखी, मिठाई आणि पूजेची थाळी घेऊन आपल्या भावांना भेटायला एकत्र जमल्या होत्या. सीमेच्या दुसऱ्या बाजूला या बहिणींचे भाऊ देखील त्यांची वाट पाहत होते.

प्रविण कुमार पुढे म्हणाले की, काही भाऊ बहिण लखनऊ, देवरिया गोंडा, बलरामपुर आणि श्रावस्ती या जिल्ह्यातून रुपईडीहा सीमेवर आले होते. खूप वेळ झालेल्या चर्चेनंतर शेवटी नेपाळी अधिकाऱ्यांशी संपर्क करुन काही वेळ सीमा खुल्या करण्यास परवानगी देण्यात आली. मास्क घालून आणि सोशल डिस्टसिंगचे नियम पाळून बहिणी आपल्या भावांना भेटतील. तसंच सॅनिटायझरचा वापर बंधनकारक करण्यात आला होता. या शर्थींवर सीमा खुल्या करण्यात आल्या असे कुमार यांनी सांगितले.

नेपाळमधून आलेल्या बहिणींनी भारतातील रुपई डिहामध्ये आणि भारतातून गेलेल्या बहिणींनी नेपाळमधील नेपालगंज मध्ये राखी पौर्णिमाचा निमित्त आपल्या भावांना राख्या बांधल्या. सोमवारी दुपारी 12 पासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत रक्षा बंधनासाठी सीमा खुल्या ठेवण्यात आल्या होत्या. या दरम्यान भारतातून सुमारे 700 बहिणी नेपाळमध्ये गेल्या होत्या. तर नेपाळमधून 400 बहिणी भारतात दाखल झाल्या होत्या. त्यानंतर सोमवारी संध्याकाळी 5 नंतर सीमारेषा पूर्वीप्रमाणे बंद करण्यात आल्या.

भारत आणि नेपाळ या देशात बहुसंख्य लोकांचे नातेवाईक राहतात. दोन्ही देशांची खुली असल्याने नातेवाईकांची भेट घेणे सोपे होते. मात्र मार्चपासून सुरु झालेल्या लॉकडाऊनमुळे या नातेवाईकांना भेटणे अशक्य झाले आहे. दरम्यान सीमेवर हाय अलर्ट असून दोन्ही देशांतील संबंध पूर्वीसारखे सुरळीत राहिलेले नाहीत.