Mukesh Ambani (Photo Credits: IANS)

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि व्यावसायिक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) जगातील सर्वात मोठे प्राणीसंग्रहालय (Zoo) उभारण्याची तयारी करत आहेत. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार अंबानी त्यांच्या मूळ राज्यात गुजरातच्या जामनगर (Jamnagar) येथे प्राणीसंग्रहालय उभारणात आहेत. याच ठिकाणी त्यांचा समूह सर्वात मोठे तेल शुद्धीकरण संकुल चालवित आहे. रिलायन्सचे कॉर्पोरेट अफेयर्स डायरेक्टर परिमल नथवाणी यांच्या म्हणण्यानुसार, हे प्राणिसंग्रहालय 2023 मध्ये सुरू होईल. या प्राणीसंग्रहालयात प्राणी, पक्षी आणि सर्पांच्या अनेक प्रजाती ठेवल्या जातील. सांगण्यात आले आहे की, मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे.

या प्रकल्पासाठी रिलायन्सने 250 एकर जमीनही निवडली असून, ती कंपनीच्या रिफायनरी प्रकल्प जामनगरमधील मोती खावडीजवळ आहे. यावर्षी लॉकडाऊन व कोरोनामुळे या प्रकल्पात थोडा विलंब झाला आहे. परंतु हा प्रकल्प येत्या 2 वर्षात पूर्ण होईल, असे आरआयएल कार्यकारी समितीने म्हटले आहे. हे प्राणीसंग्रहालय ग्रीन्स झूलॉजिकल रेस्क्यू अँड रीहॅबिलिटेशन किंगडम (Greens Zoological Rescue and Rehabilitation Kingdom) म्हणून ओळखले जाईल, असे नाथवानी यांनी सांगितले. प्राणिसंग्रहालयाच्या प्रकल्पाच्या संदर्भात आरआयएलला केंद्र आणि राज्य सरकारकडून यापूर्वीच आवश्यक परवानग्या मिळाल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. (हेही वाचा: Reliance Jio 5G Launch 2021: मुकेश अंबानी यांची घोषणा,पुढच्या वर्षी रिलायन्स जिओ 5G सेवा लॉन्च करणार)

या यादीनुसार, आफ्रिकन सिंह, चित्ता, बंगाल वाघ, पिग्मी हिप्पो, मलयान टपीर, गोरिल्ला, झेब्रा, जिराफ, आफ्रिकन हत्ती, कोमोडो ड्रॅगन, गिधाडे, ग्रीन अ‍ॅनाकोंडा, घारियल, सिवेट, ऑटर्स, ब्लॅक बक आणि शहामृग इत्यादी प्राणी पाहायला मिळतील. अंबानी यांची नेट वर्थ 80 अब्ज डॉलर्स आहे. तंत्रज्ञानापासून ते ई-कॉमर्स क्षेत्रापर्यंत त्यांचा व्यवसाय पसरला आहे. दुसरीकडे, ते आयपीएलमध्ये खेळत असलेल्या मुंबई इंडियन्स क्रिकेट संघाचे मालकही आहेत. 2014 मध्ये त्यांनी सॉकर लीग देखील सुरू केली आहे. वाढत्या कौटुंबिक संपत्तीमुळे त्यांनी आपले लक्ष सार्वजनिक उपक्रमांवर केंद्रित केले आहे. मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी 2019 मध्ये न्यूयॉर्कच्या मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टच्या बोर्डात दाखल झाल्या आहेत.