
गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या (Guillain-Barre Syndrome) वाढत्या प्रकरणांमुळे महाराष्ट्र सरकारची चिंता वाढली आहे. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात या आजाराचा प्रसार झपाट्याने होत आहे. आरोग्य तज्ज्ञांनी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. महाराष्ट्रात काल मंत्रिमंडळाची बैठक झाली ज्यामध्ये जीबीसीवर अतिशय गांभीर्याने चर्चा करण्यात आली. गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णालयात विशेष व्यवस्था निर्माण करावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, सध्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र रुग्णांना योग्य प्रकारे उपचार मिळावेत यासाठी शासकीय रुग्णालयात विशेष व्यवस्था करावी. या आजारावर केले जाणारे उपचार महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट आहेत. अजून काही प्रक्रिया करायची असल्यास सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने करावी.
सरकार अलर्ट मोडवर-
या बैठकीबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, या संदर्भात राज्य सरकारने एसओपी तयार केला आहे. जीबीएसची प्रकरणे फक्त पुणे आणि सोलापूरमध्ये नोंदवली गेली आहेत. दूषित पाण्यामुळे जीबीएस रोगाचा प्रसार होत आहे. या आजाराचा सामना करण्यासाठी एक टास्क फोर्सही तयार करण्यात आला आहे. राज्य सरकारचे आरोग्य विभाग केंद्र सरकारच्या पथकाच्या सहकार्याने काम करत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या आजाराबाबत आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी प्रशासनाला सुचना करताना सांगितले की, हा आजार दूषित पाण्यामुळे आणि न शिजवलेले अन्न, मांस खाल्यामुळे होतो. त्यामुळे अशाप्रकारचे अन्न टाळावे, पाणी उकळून पिण्याबाबत नागरिकांना आवाहन करावे. पुण्यात 31 तारखेला क्रिकेट सामना आहे. त्यावेळी पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करावी. (हेही वाचा: GBS Outbreak In Maharashtra: पुण्यानंतर आता नागपूरात गिलेन-बॅरे सिंड्रोमच्या 6 नवीन रुग्णांची नोंद; 8 वर्षीय मुलावर आयसीयूमध्ये उपचार सुरू)
पुण्यातील आजाराची स्थिती-
पुण्यात सध्या 111 रुग्ण आहेत, 80 रुग्ण पाच किमीच्या परिघातील आहेत. 65 हजार घरांचे सर्वेक्षण पूर्ण केले असून नागरिकांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. चाचणी घेण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी यांची मदत घेतली जाते आहे. एक मृत्यू झाला तो अद्याप जीबीसीमुळेच झाला याची अजून पुष्टी नाही. उपचारासाठी पुणे महानगरपालिकेचे कमला नेहरू रुग्णालय सज्ज असुन वैद्यकीय सहाय्यता निधीची मर्यादा एक लाखावरुन दोन लाखापर्यंत वाढवण्यात आली आहे.
जीबीएस आजाराची सर्वसाधारण लक्षणे-
अचानक पायातील किंवा हातात येणारी कमजोरी किंवा लकवा
अचानकपणे उद्भवलेला चालण्यातील त्रास किंवा कमजोरी
जास्त दिवसांचा डायरिया
अशा प्रकारचे लक्षणे जाणवल्यास नागरिकांनी घाबरून न जाता सरकारी रुग्णालयात तपासणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात.
जीबीएस विषाणुपासून बचावाच्या उपाययोजना-
पाण्याचा दर्जा चांगला ठेवण्यासाठी पिण्याचे पाणी उकळून प्यावे.
ताजे आणि स्वच्छ अन्न पदार्थांचे सेवन करावे. संसर्ग टाळण्यासाठी शिजवलेले आणि न शिजवलेले अन्नपदार्थ एकत्र ठेवू नये.
वैयक्तिक स्वच्छतेवर भर देण्यात यावा.
दरम्यान, हा आजार दुर्मिळ आहे पण बहुतेक रुग्ण बरे होतात. हा आजार संसर्गजन्य नाही, प्रतिकारशक्ती कमी झाल्याने हा आजार होतो. शासकीय दवाखान्यामध्ये या आजाराच्या उपचारासाठी सर्व यंत्रणा सज्ज असून याबाबत शासन प्राधान्याने उपाययोजना करत आहे, असे प्रशासनाने नमूद केले.