Former Union Minister Jaswant Singh Passes Away: माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन; पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटद्वारे अर्पण केली श्रद्धांजली
Jaswant Singh (Photo Credits: PTI)

माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह (Jaswant Singh) यांचे आज (27 सप्टेंबर) सकाळी 6.55 वाजता निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखरेचा श्वास घेतला. 25 जून पासून त्यांना दिल्लीतील आर्मीच्या आर. अँड आर. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मल्टीऑर्गन डिसफंक्शन सिंड्रोमसह सेप्सिस यासाठी त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज सकाळी कार्डियक अरेस्ट मुळे त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान त्यांची कोविड-19 ची चाचणी निगेटीव्ह आली होती. अशी माहिती दिल्लीच्या रिसर्च आणि रेफरल हॉस्पिटलमधून (Research and Referral Hospital) देण्यात आली आहे.

जसवंत सिंह यांनी देशातील विविध राजकीय पदं भूषवली होती. भारतीय जनता पक्षाच्या मुख्य संस्थापकांपैकी जसवंत सिंह हे एक होते. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात संसदेत खूप महत्त्वाचे निर्णय घेतले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी ट्विट करत त्यांना श्रद्धांजली अपर्ण केली आहे. ट्विटमध्ये मोदींनी म्हटले की, "जयवंत सिंह यांनी आपल्या देशाची खूप सेवा केली. सर्वप्रथम एक सैनिक म्हणून आणि त्यानंतर एक राजकीय नेता म्हणून देशासाठी आपले योगदान दिले. राजकीय आणि सामाजिक विषयांवरील त्यांचा अनोखा दृष्टीकोन यामुळे जसवंत सिंह कायम लक्षात राहतील."

PM Narendra Modi Tweet:

जसवंत सिंह जी त्यांच्या बौद्धिक क्षमतेमुळे आणि देशाच्या सेवेसाठी केलेल्या उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांच्या लक्षात राहतील. राजस्थानमध्ये भाजपाला बळकटी देण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्याचबरोबर त्यांनी विविध भूमिकांमधून देशसेवा केली. ते एक प्रभावी नेते होते, असे राजनाथ सिंह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसंच त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे त्यांनी म्हटले.

Rajnath Singh Tweet:

जयवंत सिंह हे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे घनिष्ट मित्र होते. अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात त्यांनी राजकारणात आपली महत्त्वाची भूमिका मांडली होती. 2014 मध्ये जयवंत सिंह हे आपल्या बाथरुमध्ये घसरुन पडले होते आणि त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती. त्यानंतर त्यांना दिल्लीतील आर्मी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून जसवंत सिंह हे कोमात होते.