
फोर्ब्सने 2020 ची 100 श्रीमंत भारतीयांची यादी (Forbes India Rich List 2020 जाहीर केली आहे. या यादीमध्ये प्रथमच बर्याच नावांचा समावेश झाला आहे. सर्वात श्रीमंत 100 जणांच्या संपत्तीमध्ये 2019 च्या तुलनेत 14 टक्के वाढ झाली आहे, म्हणजे 517.5 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries Limited) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे सलग 13 व्या वर्षी फोर्ब्सच्या यादीतील भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांची एकूण संपत्ती 88.7 अब्ज डॉलर्स इतकी आहे. मार्केट कॅपिटलायझेशनद्वारे त्यांची कंपनी आरआयएल (RIL) ही देशातील सर्वात मोठी कंपनी आहे.
मुकेश अंबानी यांची संपत्ती वाढविण्यात रिलायन्सचा मोठा हात आहे. अलीकडेच जगातील अनेक बड्या गुंतवणूकदारांनी रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये गुंतवणूक केली आहे. फेसबुक आणि गुगल सारख्या दिग्गजांनी जिओ प्लॅटफॉर्ममध्ये 20 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली. याशिवाय अनेक नामांकित इक्विटी फंडांनीही रिलायन्स रिटेलमध्ये पैसे गुंतवले आहेत.
फोर्ब्सच्या यादीत अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी हे देशातील दुसर्या क्रमांकाचे धनकुबेर म्हणून पुढे आले आहेत. त्यांच्याकडे 25.2 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. यानंतर, एचसीएल टेक्नोलॉजीजचे चेअरमन शिव नादर, 20.4 अब्ज डॉलर्सच्या मालमत्तेसह तिसर्या क्रमांकावर आहेत. इतर टॉप 10 मध्ये, राधाकिशन दमानी (15.4 अब्ज डॉलर्स), हिंदुजा बंधू (12.8 अब्ज डॉलर्स), सायरस पूनावाला (11.5 अब्ज डॉलर्स), पालोनजी मिस्त्री (11.4 अब्ज डॉलर), उदय कोटक (11.3 अब्ज डॉलर्स), गोदरेज कुटुंब (11 अब्ज डॉलर) आणि लक्ष्मी मित्तल (10.3 अब्ज डॉलर्स) यांचा समावेश आहे. (हेही वाचा: Reliance Jio ने लाँच केला 1,499 रुपयांचा प्लान; ग्राहकांना मिळणार 300GB डेटा आणि अनलिमिटेड कॉल)
दरम्यान, फोर्ब्सच्या इंडिया रिच लिस्ट 2020 मध्ये पहिल्या 100 श्रीमंतांमध्ये केवळ तीन महिलांचा समावेश आहे. ओपी जिंदल ग्रुपच्या सावित्री जिंदल 6.6 अब्ज डॉलर्स संपत्तीसह 19 व्या क्रमांकावर आहेत. बायोकॉनच्या किरण मजुमदार शॉ यांची एकूण संपत्ती 4.6 अब्ज डॉलर्स असून त्या 27 व्या क्रमांकावर आहेत. युएसव्हीच्या लीना तिवारी तीन अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह 47 व्या स्थानावर आहेत.