PM Narendra Modi & Milind Soman (Photo Credits: Twitter)

फिट इंडिया मोहिमेच्या  (Fit India Campaign) वर्षपूर्ती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज (24 सप्टेंबर) फिटनेस क्षेत्रातील दिग्गजांशी संवाद साधला. देशातील तरुणांना फीटनेसचं महत्त्व पटवून देणे आणि फीट राहण्यासाठी प्रेरित करणे हा त्यामागील उद्देश होता. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदींनी आयर्न मॅन मिलिंद सोमण (Milind Soman) याच्या 81 वर्षीय आईचे उदाहरण दिले. मिलिंदच्या आईने 60 वर्षांची असताना ट्रॅकिंग सुरु केली होती. तसंच फीट राहण्यासाठी जीमला जायलाच हवे, असे काही नाही. मी आठ बाय दहाच्या जागेतही फिट राहू शकतो, असे मिलिंद सोमण याने सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रश्नाचे उत्तर देताना मिलिंद सोमण म्हणाला की, "माझे कोणतेही रुटीन नाही. मला व्यायाम करायला आवडतो. दिवसभरात कितीही वेळ मिळो अगदी तीन मिनिटे किंवा तीन तास मी व्यायाम करतो. मी कधीही जीमला जात नाही. कोणतेही मशीन वापरत नाही. सामान्यतः फीट आणि हेल्दी राहण्यासाठी घरातच सोप्या गोष्टींच्या आधारे राहू शकतो. मी अनेकदा लोकांना सांगतो की, मी आठ बाय दहाच्या जागेतही फीट राहू शकतो."

ANI HindiNews Tweet:

पुढे मिलिंद सोमण याने सांगितले की, "मी 2012 मध्ये दिल्ली ते मुंबई धावलो होतो. माझी आई माझे प्रेरणास्थान आहे. ती 81 वर्षांची आहे आणि या वयात ती जे करु शकते. तसे मला तिच्या वयाचे असताना व्हायचे आहे. तसंच माझे आजोबा 40-40 किमी पायी चालायचे. अजूनही देशातील अनेक भागात महिला पाण्यासाठी 40 किमी पायी चालतात, असेही मिलिंद याने सांगितले." दरम्यान, "मी मॅरेथॉन धावू शकतो," असा विश्वासही त्याने व्यक्त केला.

"फिटनेसचे महत्त्व लोकांना कळायला हवे. सामान्य जीवनात फीट राहण्याचे वेगवेगळे मापदंड आहेत. 40 व्या वर्षी आयुष्य संपत नाही तर तेथून आयुष्य सुरु होऊ शकते. फीट इंडिया मोहिमेद्वारे ही समज विकसित होईल," असेही मिलिंद सोमण म्हणाला.

दरम्यान, या कार्यक्रमात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर आदी सेलिब्रिटी सहभागी झाले होते. भारतातील नागरिकांना  फिट बनवण्यासाठी पंतप्रधानांनी फिट इंडिया मोहिमेला सुरुवात केली. या मोहिमेद्वारे नागरिकांना फिट आणि हेल्थी राहण्यासाठी जागरुक केले जाते.