Firing on Bhojpuri Singer Golu Raja (Photo Credits: Twitter)

आजकाल कधी कुठे काय घडेल याचा काही नेम नाही. कधी कधी उत्साहाच्या भरात केलेल्या गोष्टी जीवावर बेततात. अशा अनेक घटना आपल्याला अलीकडे ऐकायला मिळत आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बलियामध्ये (Baliya) घडली आहे. बलियातील महकालपूर (Mahkalpur) गावात भाजप नेत्याच्या पार्टीत उत्साहाच्या भरात झालेला गोळीबार हा तेथील गायकाच्या जीवावर बेतला आहे. भोजपुरी गायक गोलू राजा (Golu Raja) असे त्यांचे नाव आहे. या कार्यक्रमात लोकांचे मनोरंजन करण्यासाठी मंचावर गोलू राजा गाणे गात असताना तेथील लोकांनी उत्साहाच्या भरात गोळीबार केला. मात्र यात गोलू राजाला गोळी लागून ते गंभीर जखमी झाले आहेत. हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

मिळालेल्या रिपोर्टनुसार, भाजपचे युवा मोर्चा जिल्ह्याचे उपाध्यक्ष भानू दुबे (Bhanu Dubey) यांच्या मुलाचा वाढदिवस होता. त्यानिमित्त महकालपूर गावात पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी तेथील मंचावर संगीत आणि नृत्याचा कार्यक्रम सुरु होता. यावेळी भोजपुरी गायक गोलू राजा हे गाणे गात होते. त्या दरम्यान तेथील लोकांनी आनंदाच्या भरात गोळीबार केला. यात नकळत गोलू राजा यांना गोळी लागली. Aurangabad: मद्यधूंद 'ती' बेधुंद झाली, कुख्यात गुंडासोबत कारवर नाचली; औरंगाबाद येथे कायद्याची पायमल्ली जनतेने भररस्त्यात पाहिली

पाहा धक्कादायक व्हिडिओ:

या व्हिडिओमध्ये गोलू राजा गाणे गात असताना मागे वळतात तेव्हा त्यांच्या दंडाला गोळी लागल्याचे स्पष्ट दिसत आहे. गोलू राजा यांनी मंचावरून खाली उडी मारली. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहे. वाढदिवसाप्रसंगी गोळीबार का करण्यात आला व तो कोणी केला. या सर्व गोष्टींचा तपास सुरु आहे. लोकांचा अतिउत्साह एखाद्याच्या जीवावर बेतू शकतो हे या प्रसंगावरून दिसते.