टोल नाका (Photo Credits: Twitter)

गेल्या काही महिन्यांपासून केंद्र सरकार फास्टॅगबाबत (FASTag) जागरुकता निर्माण करत आहे. मात्र आपण अद्याप आपल्या कारवर फास्टॅग बसवले नसेल, तर आता आपल्याकडे ते विनामूल्य घेण्याची संधी आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) च्या टोल प्लाझावर येते 15 दिवस फास्टॅग विनामूल्य उपलब्ध असतील. एनएचएआय टोल प्लाझावर 15 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी दरम्यान फास्टॅग घेण्यास शुल्क आकारले जाणार नाही.

यापूर्वी, फास्टॅग 22 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2019 पर्यंत एनएचएआयवर विनामूल्य देखील उपलब्ध करुन देण्यात आले होते. राष्ट्रीय महामार्गाच्या टोल प्लाझामधून जाणाऱ्या चार चाकी वाहनावर फास्टॅग लावणे बंधनकारक झाले आहे.

केंद्र सरकार हे तंत्रज्ञान डिजिटल पेमेंटला चालना देण्यासाठी, प्रदूषण कमी करण्यासाठी आणि टोल नाक्यावरील लांबच्या लांब लागलेल्या रांगा कमी करण्यासाठी योजले आहे. फास्टॅगसाठी 100 रुपये न आकारण्याचा निर्णय एनएचएआयने घेतला आहे. एनएचएआयचे फास्टॅग्स हे एनएचएआय टोल प्लाझा, आरटीओ, सामान्य सेवा केंद्रे, वाहतूक केंद्र आणि पेट्रोल पंपांवर उपलब्ध असतील. फास्टॅग घेण्यासाठी ग्राहकांना वाहन नोंदणी प्रमाणपत्राची प्रत म्हणजे आरसी जवळ बाळगणे आवश्यक आहे.

(हेही वाचा: राष्ट्रीय महामार्गांवरुन प्रवास करताना चालकांना FasTag सोबत ठेवणे अनिवार्य)

एनएचएआय जवळचे फास्टॅग विक्री केंद्र शोधण्यासाठी, मायफास्टॅग app, डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू.आयएचएमसीएल डॉट कॉम किंवा एनएच हेल्पलाईन क्रमांक 1033 वर संपर्क साधता येईल. दरम्यान, फास्टॅग हे एक प्रकारचे इलेक्ट्रॉनिक टोल संकलन तंत्रज्ञान आहे, जे राष्ट्रीय महामार्गाच्या टोल प्लाझावर उपलब्ध आहे. हे तंत्र रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (आरएफआयडी) तत्वावर कार्य करते. हा टॅग वाहनाच्या विंडस्क्रीनवर लावण्यात येतो, जेणेकरून टोल प्लाझावरील सेन्सर ते वाचू शकेल. यामुळे टोल प्लाझावरील वाहन जेव्हा फास्टॅग लेनमधून जाईल, तेव्हा टोल शुल्क आपोआप वजा केले जाईल. यामुळे टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा लागण्याचे प्रमाण कमी होणार आहे.