सध्या कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर देशात 21 दिवसांचा लॉक डाऊन काळ सुरु आहे. मात्र कोरोना बाधितांच्या दिवसेंदिवस वाढत असलेल्या घटना पाहता हा विषाणू अजून बराच काळ देशात तग धरून राहील असे बोलले जात आहे व यामुळे सर्वांना चिंता लागलेली आहे ती आर्थिक मंदीची आणि आपल्या नोकरीची. मात्र लॉकडाऊन दरम्यान किराणा सामान विकणारी ‘बिगबास्केट’ (BigBasket) ही ऑनलाइन कंपनी देशभरातील प्रलंबित ऑर्डर त्वरित वितरीत करण्यासाठी, दहा हजार लोकांना कामावर घेण्याचे विचार करीत आहे.
कंपनीचे उपाध्यक्ष (एचआर) तनुजा तिवारी यांनी याबाबत माहिती दिल्याप्रमाणे, ‘कंपनी वेअरहाऊस आणि डिलिव्हरीसाठी दहा हजार लोकांना कामावर घेण्याचा विचार करीत आहे. देशातील ज्या ठिकाणी बिगबास्केटची शाखा आहे अशा सर्व 26 ठिकाणी ही भरती होणार आहे’. लॉकडाऊन दरम्यान देशभरातील अनेक सेवा-सुविधा बंद आहेत तसेच लोक घरातून बाहे पडणेही टाळत आहेत. अशावेळी ऑनलाईन गोष्टी मागवण्यावर भर दिला जात आहे. मात्र सध्या या गोष्टीही वेळेवर वितरीत होत नाहीत तसेच लॉकडाउन संपल्यावर मागणी आणखी वाढू शकते. हाच विचार करून ‘बिगबास्केट’ने लोकांना नोकरीवर ठेवण्याचा विशार केला आहे. (हेही वाचा: टाळ्या वाजवणे, दिवे लावणे हा कोरोना व्हायरसवरील उपाय नाही, राहुल गांधी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा)
दरम्यान, देशातील कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाउन लागू झाल्यानंतर, ई-कॉमर्स कंपन्यांना अडचणी येत आहेत. सरकारने लॉकडाउनमधून अत्यावश्यक वस्तूंच्या वितरणास सूट दिली असली, तरी कंपन्या सतत विविध अडचणी येत असल्याच्या तक्रारी करत आहेत. अशात कंपन्यांनी ऑनलाईन डिलिव्हरी स्वीकारणे सुरु केले आहे, मात्र त्यांना आता लोकांची गरज आहे. काल डोमिनोजनेही आयटीसीशी करार करून पीठ आणि मसाले यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंची डिलिव्हरी सुरू केली आहे. सध्या कंपनीने केवळ बंगळूरमध्ये ही सुविधा सुरू केली आहे.