5 नोव्हेंबरपर्यंत मुंबई सोडून जाऊ नये; भाजपच्या आमदारांना चंद्रकांत पाटील यांचे आदेश
चंद्रकांत पाटील (Photo credit : facebook)

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून 1 आठवडा उलटला आहे, तरी राज्यात सत्ता स्थापन झाली नाही. शिवसेना आणि भाजप (shiv Sena-BJP) यांच्यामधील चर्चेचा अजूनही काहीच तोडगा निघाला नाही. अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद यावर शिवसेना ठाम आहे, तर भाजप आपल्याकडील महत्वाची पदे सोडायला तयार नाही. अशा परिस्थितीत भारतीय जनता पक्षाने आपल्या सर्व आमदारांना ‘5 नोव्हेंबरपर्यंत कोणीही मुंबई सोडून बाहेर जाऊ नका,’ असे स्पष्ट आदेश दिले आहेत. यामुळे पुण्यातील आमदारही सध्या मुंबईमध्येच तळ ठोकून आहेत.

विधानसभा निवडणुकीत भाजपला 105 जागा, तर शिवसेनेला 54 जागा मिळाल्या आहेत. भाजपला सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेची मदत हवी आहे, मात्र शिवसेनेने आपल्या काही अटी भाजपसमोर ठेवल्या आहेत. याच अटींमुळे अजूनही राज्यात सत्ता स्थापन झाली नाही. दुसरीकडे महाराष्ट्रातील राजकारणापासून भाजपला दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमध्ये खलबते सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षाच्या सर्व आमदारांना 5 नोव्हेंबरपर्यंत मुंबई सोडू नये, असे आदेश दिले आहेत. (हेही वाचा: उद्धव ठाकरे यांचा उद्या ओला दुष्काळ दौरा; पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची घेणार भेट)

ऐन हिवाळ्यात महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. एकीकडे पक्षांमधील चर्चा तर दुसरीकडे राज्यातील आमदारांचा पाठींबा मिळवण्याची धडपड. अशा परिस्थितीत भाजपचे सर्व आमदार मुंबईमध्येच आहेत. या दरम्यान उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानंतर शरद पवार दिल्लीला जाऊन कॉंग्रेस पक्षप्रमुख सोनिया गांधी यांचीही भेट घेणार आहेत.