शाहीन बाग (Shaheen Bagh) येथील सामाजिक कार्यकर्ते शहजाद अली (Shahzad Ali) यांनी आज भाजप (BJP) मध्ये प्रवेश केला. दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष आदर्श गुप्ता यांच्या उपस्थितीत ते भाजपमध्ये सामील झाले. यावेळी भाजप नेते श्याम जाजू देखील उपस्थित होते. या दरम्यान अली म्हणाले की, ‘आमच्या समाजातील काही लोक भाजपाला आपला शत्रू मानतात व आता मी त्यांना चुकीचे सिद्ध करू इच्छितो.’ भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतल्यानंतर शहजाद अली म्हणाले, ‘मी भाजपमध्ये सामील झालो आहे, जेणेकरून या पक्षाला आपला शत्रू मानणाऱ्या माझ्या समुदायामधील लोकांना मी चुकीचे ठरवू शकेन. याशिवाय सीएएच्या मुद्दय़ावरही आम्ही त्यांच्याशी चर्चा करू.’
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाने शाहीन बागेतील कार्यकर्त्यांचा सीएएविरोधातील निषेध करण्याचा मोठा मुद्दा बनविला होता, पण आता त्याच भागातील समाजसेवक आणि तरूण मुस्लिम चेहऱ्याने कमळ हाती घेतले आहे. दरम्यान, दिल्ली भाजप अध्यक्ष आदेश गुप्ता म्हणाले की, ‘पक्षाला सर्व मुस्लिम बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणायचे आहे. आज शेकडो मुस्लिम बांधव पक्षात सामील झाले आहेत. त्यांना असे आढळले आहे की, येथे मुस्लिमांमध्ये कोणताही भेदभाव नाही. तिहेरी तलाकच्या मुद्यावर पंतप्रधान मोदींनी उचललेली पावले पाहता पक्षात सामील झालेल्या सर्व महिलांचे अभिनंदन.’
एएनआय ट्वीट -
Delhi: Shaheen Bagh social activist Shahzad Ali joins BJP in presence of State BJP President Adesh Gupta & leader Shyam Jaju. Shahzad Ali says, "I have joined BJP to prove wrong those in our community who think BJP is our enemy. We'll sit together with them over CAA concerns." pic.twitter.com/bJyhGp7MMb
— ANI (@ANI) August 16, 2020
भाजप नेते श्याम जाजू म्हणाले की, ‘प्रत्येक मुस्लिमांना हे माहित झाले आहे की कोणालाही राष्ट्रीयत्व सिद्ध करण्याची गरज नाही. जेव्हा जेव्हा सीएएबद्दल चर्चा होते तेव्हा काही राजकीय पक्ष मुस्लिमांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. परंतु देशातील प्रत्येक मुस्लिमांना हे माहित झाले आहे की, त्यांना काहीही सिद्ध करण्याची गरज नाही. कोणालाही मतदान करण्याचा अधिकार आणि त्यांचे नागरिकत्व नाकारले जाणार नाही.’ (हेही वाचा: राहुल गांधींचा आरोप- भारतात Facebook, WhatsApp वर भाजपा-आरएसएसचे नियंत्रण आहे, पसरवतात खोट्या बातम्या आणि तिरस्कार)
दरम्यान, डिसेंबर 2019 मध्ये मोदी सरकारने संसदेमधून सीएए (नागरिकता दुरुस्ती विधेयक) संमत करून नागरिकत्व सुधारणा कायदा बनविला, त्या अंतर्गत पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश येथून येणार्या बिगर-मुस्लिम शरणार्थींना नागरिकत्व देण्याची तरतूद आहे. या कायद्यांतर्गत धार्मिक छळामुळे 31 डिसेंबर 2014 पूर्वी भारतात आलेल्या या तिन्ही देशांतील हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन यांना भारताचे नागरिकत्व दिले जाईल. परंतु या कायद्याच्या निषेधार्थ मुस्लिम समुदायाने देशभरात धरणे आंदोलन केले, ज्यामध्ये दिल्लीच्या शाहीन बागेत झालेले आंदोलन चर्चेत होते. इतकेच नाही तर सीएएला कॉंग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी तीव्र विरोध दर्शविला.