Covid-19 Vaccination in India: आजपासून 18-44 वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण
Covid-19 Vaccine | Representational Image | (Photo Credits: Pixabay.com)nation)

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या लसीकरणाच्या नव्या धोरणानुसार आजपासून 18-44 वयोगटातील नागरिकांसाठी मोफत कोविड-19 लसीकरण (Free Covid-19 Vaccination) सुरु करण्यात येणार आहे.  लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन करताना कोणतीही अडचण येऊ नये. यासाठी पहिल्या टप्प्यात 30-44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. त्यानंतर 18-29 वयोगटातील नागरिकांचे टप्प्याटप्प्याने लसीकरण करण्यात येईल.

या लसीकरण मोहिमेसाठी मुंबई, ठाणे पालिका प्रशासन तयारीत आहे. विशेष म्हणजे आठवड्यातील पहिल्या तीन दिवशी म्हणजेच सोमवार, मंगळवार, बुधवारी नोंदणी शिवाय लस घेता येणार आहे. तर गुरुवार, शुक्रवार, शनिवार या तीन दिवशी लस घेण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. (भारत सरकार कडून 21 जून पासून सुरू होणार राष्ट्रीय कोविड लसीकरण कार्यक्रम; नवी नियमावली जारी)

कॉर्पोरेट कार्यालये आणि गृहनिर्माण संस्था यांनी देखील लसीकरणासाठी पुढाकार घेतला आहे. याचा एकंदर परिणाम लसीकरणाचे प्रमाण वाढण्यासाठी होत आहे. या लसीकरण मोहिमेत फेरिवाले, रिक्षाचालक यांना प्राधान्य देण्याचा विचार आहे. यांचे लसीकरण झाल्यास कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येण्यास यश येईल, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

सध्या पालिका केंद्रांवर दररोज 100 लसींचा साठा दिला जात आहे. सध्या पालिकेकडे एक लाख अकरा हजार लसी उपलब्ध असल्याने प्रत्येक केंद्रावर 100 ऐवजी 300 लसी दिल्या जातील, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त काकाणी यांनी सांगितले. मात्र केंद्राकडून होणाऱ्या लसींच्या पुरवठ्यात खंड पडून त्याचा लसीकरणावर परिणाम होऊ नये, अशी पालिकेची इच्छा आहे.

दरम्यान, ठाणे पालिका क्षेत्रात 45 वर्षांवरील नागरिकांना मंगळवार, शनिवार या दोनच दिवस तर इतर दिवशी 30-44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होणार आहे. तर नोंदणी करणाऱ्यांसाठी आणि विनानोंदणी येणाऱ्यांसाठी प्रत्येकी 50 टक्के लसी उपलब्ध असतील.