कोरोना व्हायरस विरुद्धचा लढा ही सारे भेदभाव विसरुन एकत्र येण्याची संधी; ट्विटच्या माध्यमातून राहुल गांधी यांचा देशवासियांना खास संदेश
Rahul Gandhi Shares Heart-Warming Picture on Twitter (Photo Credits: Twitter, @RahulGandhi)

भारत देशात कोरोनाचे संकट जितके गंभीर होत आहे. तितकाच कोरोना विरुद्धचा लढाही तीव्र होत आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून त्यामुळे बळी पडलेल्यांची संख्याही वाढत आहे. दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी खास ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी एक सुंदर फोटो ट्विट केला आहे. या फोटोत दोन लहान मुलं एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून एकमेकांकडे पाहून हसत आहेत. या फोटोतील दोन लहान मुलं हे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक आहे. एक मुलगा कृष्णाच्या रुपात दिसत आहे. तर एकाने मुस्लिम पेहराव धारण केला आहे. हा फोटो ट्विट करत राहुल गांधी यांनी एक सुंदर संदेश देशवासियांना दिला आहे. (टाळ्या वाजवणे, दिवे लावणे हा कोरोना व्हायरसवरील उपाय नाही, राहुल गांधी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा)

"कोरोना व्हायरस विरुद्धचा लढा ही भारतीयांना एकत्र येण्यासाठी मिळालेली संधी आहे. यामुळे धर्म, जात, पंथ हे सारे भेदभाव विसरुन आपण एका समान लक्ष्यासाठी एकत्र येऊ. म्हणजेच या जीवघेण्या व्हायरसवर मात करण्यासाठी आपण एकत्रित होऊ. या लढ्यात दया, करुणा आणि आत्मत्यागाची भावना महत्त्वाची आहे. एकत्रितपणे आपण हे युद्ध जिंकू," असा संदेश राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटरवरील पोस्टच्या माध्यमातून दिला आहे.

राहुल गांधी ट्विट:

कोरोना व्हायरसच्या संकटात राहुल गांधी यांनी सुरुवातीपासून सक्रीय सहभाग दर्शवला. संकट काळात त्यांनी काही वेळेस मोदी सरकारवर टीका केली असली तरी अनेकदा मोदी सरकारचे कौतुकही केले आहे. लॉकडाऊन नंतर सरकारच्या विशेष आर्थिक पॅकेजच्या घोषणेवर सरकारचा निर्णय योग्य असल्याचे ट्विट त्यांनी यांनी केले होते. तसंच कोरोना विरुद्धच्या लढ्यात काँग्रेस पक्ष सरकारच्या पाठीशी असल्याचे पत्रही राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना लिहिले होते. विशेष म्हणजे  कोरोनाशी लढा देण्यासाठी खास टिप्सही राहुल गांधी यांनी मोदी सरकारला दिल्या होत्या.