कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट आणि त्यानंतरच्या लॉकडाऊन (Lockdown) मुळे चालू कॅलेंडर वर्षाच्या (2020) एप्रिल ते जून या कालावधीत रिअल इस्टेट (Real Estate) उद्योगाला मोठा झटका बसला आहे. या कालावधीमध्ये घरांची विक्री (Housing Sales) 81 टक्क्यांनी घटून, 12,740 युनिट्सची नोंद झाली आहे. मालमत्ता सल्लागार एनारॉक (Anarock) यांनी गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. एप्रिल-जून 2019 या कालावधीमध्ये दिल्ली-एनसीआर, मुंबई महानगर प्रदेश, पुणे, बेंगळुरू, हैदराबाद, चेन्नई आणि कोलकाता या सात मोठ्या शहरांमध्ये घरांची विक्री 68,600 इतकी झाली असल्याचे अहवालात म्हटले आहे.
इतकेच नव्हे तर सध्याच्या काळात नवीन घरांची ऑफरही 98 टक्क्यांनी घसरून, 1,390 युनिट्स होण्याची अपेक्षा आहे. मागील वर्षी याच कालावधीत 69,000 नवीन घरे विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आली होती. याबाबत Anarock चे अध्यक्ष अनुज पुरी म्हणाले की, ‘या तिमाहीत लॉकडाऊनमुळे बहुतेक घरांच्या विक्री आणि ऑफर्समध्ये पूर्व अपेक्षेने घट झाली आहे. कोरोना व्हायरस नियंत्रणासाठी 25 मार्चपासून देशव्यापी लॉक डाऊन सुरू करण्यात आला, यामुळे बांधकाम कामे पूर्णपणे बंद झाली. यासह घरांची विक्रीही जवळपास ठप्प झाली होती. सध्याची परिस्थिती लक्षात घेता अनेक डेव्लहपर्स आता त्यांची डिजिटल विक्री क्षमता वाढवत आहेत.’
अहवालात म्हटले आहे की, एप्रिल ते जून 2020 दरम्यान दिल्ली-एनसीआरमधील घरांची विक्री 83 टक्क्यांनी घसरून, 2,100 युनिट्सवर येण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षातील याच काळात ही संख्या 12,640 युनिट होती. त्याचप्रमाणे मुंबई महानगर क्षेत्रातील घरांची विक्री 83 टक्क्यांनी घसरून, 21,360 वरून 3,620 युनिटवर येण्याची शक्यता आहे. बेंगळुरुची विक्री 77 टक्क्यांनी घसरून 2,900 युनिट्सची अपेक्षा आहे. गेल्या वर्षी याच काळात ही संख्या 13,150 होती.
पुण्यात घरांची विक्री 79 टक्क्यांनी घसरून 10,490 युनिटवरून 2,160 युनिटपर्यंत आणि हैदराबादमध्ये 85 टक्क्यांनी कमी होऊन ती, 4,430 युनिट्सवरून 660 युनिट्सवर जाईल. चेन्नईतील विक्री 84 टक्क्यांनी घसरून, 2990 वरून 480 वर येण्याची शक्यता आहे.