Mamata Banerjee (Photo Credits: ANI)

कोलकाता येथे सीबीआय आणि स्थानिक पोलिसांमधील ताणतणावानंतर मोदींविरोधात ममता बनर्जी यांनी धरणं आंदोलनाला सुरुवात केली. 'संविधान बचाव' अशा घोषणा देत बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी (Mamata Banerjee) यांनी आंदोलनाला सुरुवात केली. ममता बनर्जींच्या या आंदोलनाला विरोधकांनीही पाठिंबा दर्शवला आहे. समाजवादी पार्टी, राष्ट्रीय जनता दल आणि आम आदमी पार्टीने ममता यांच्या धरणं आंदोलनाचे समर्थन केले आहे.

यावर राहुल गांधींनी ट्विट करत ममता बनर्जींना पाठिंबा दर्शवला आहे. काल रात्री उशिरा ममता बनर्जींना फोन करुन काँग्रेस पक्ष तुमच्यासोबत खांद्याला खांदा देत उभा असल्याचे राहुल गांधींनी सांगितले. बंगालमधील घटना या भारतीय संस्थांवर मोदी आणि भाजपकडून होत असलेल्या हल्ल्याचाच भाग असल्याचेही ते म्हणाले. सर्व विरोधकांनी एकत्र येऊन या जातीयवादी शक्तींचा पराभव करु, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही फेसबुकवर पोस्ट करत ममता बनर्जी यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.

त्यानंतर अरविंद केजरिवाल, लालू प्रसाद यादव यांसारख्या अनेक नेत्यांनी ममता बनर्जी यांच्या आंदोलनाचे समर्थन केले आहे. या प्रकरणी सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून यावर उद्या न्यायालयात सुनावणी होणार आहे.