धक्कादायक! चोरीच्या संशयावरून शेजाऱ्याच्या मुलाला मुंगी मारायचं औषध खाऊ घालून पिठाच्या डब्ब्यात कोंडलं, आरोपी महिलेची कबुली
Representational Image | (Photo Credits: PTI)

भोपाळ: एकदा का डोक्यात संशयाचं भूत शिरलं की त्याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी माणूस कोणत्याही ठरला जाऊ शकतो, असं म्हणतात, असाच काहीसा प्रकार भोपाळ (Bhopal) मधील कोलार (kolar) परिसरात घडला आहे. चोरीच्या संशयावरून एका महिलेने आपल्या शेजाऱ्याला अद्दल घडवायची ठरवले आणि त्याच भावनेतून शेजाऱ्याच्या तीन वर्षाच्या मुलाला बळी घेतल्याचे समजत आहे. वरुण मीणा असं मृत बालकाचं नाव आहे. या महिलेने चिमुकल्याला मुंग्या मारायचे औषध खाऊ घालून बेशुद्ध केले आणि मग त्याला एका गव्हाच्या डब्यात कोंडून ठेवले होते, साहजिकच इवल्याश्या मुलाला हा अत्याचार सहन न झाल्याने त्या डब्यातच त्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी सुनीता सोलंकी या महिलेने स्वतः पोलिसांना कबुली दिल्याने त्यानंतर तिला अटक करण्यात आली यासोबतच पोलिसांनी तिच्या 16 वर्षाच्या मुलाला सुद्धा ताब्यात घेतले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात सुनीताच्या घरी चोरी झाली होती. सुनीताला याप्रकरणी मीणा कुटुंबावर संशय होता. त्यामुळे हा बदल घेण्यासाठी तिने त्यांचा मुलगा वरुणचं अपहरण केलं. त्यानंतर चिमुकल्या वरुणला चपातीतून मुंग्या मारण्याचं औषध देऊन बेशुद्ध केलं व त्याच अवस्थेत त्याला गव्हाच्या डब्यात लपवून ठेवलं. यानंतर तीन दिवस वरुण बेपत्ता होता. मीणा कुटुंबीयांनी याची तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.त्यानंतर सोमवारी सुनीताने जवळच असलेल्या रिकाम्या घरात त्याचा मृतदेह जाळला.

ANI ट्विट

दरम्यान,पोलिसांनी वरुणचा जळालेला मृतदेह ताब्यात घेतला आहे. घटनास्थळी पुजेचे साहित्य होतं. नारळ, पेढ्याचा बॉक्स आणि सफेद रंगाचे कपडे आढळून आले. हा नरबळीचा प्रकार असल्याचं स्थानिकांना वाटलं. मात्र, पोलिसांनी ही शक्यता फेटाळून लावली होती. पोलिसांनी सध्या सुनीताला ताब्यात घेतले असून तिच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे सांगितले आहे.