गुजरातच्या (Gujarat) वडोदरा (Vadodara) येथील बॅंक ऑफ बडोदा (Bank of Baroda) च्या एका शाखेत बँकेच्या लॉकर मध्ये ठेवलेल्या 2 लाख रुपयांची रक्कम वाळवीने (Termites) खाऊन टाकल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. त्यामुळे बँकेतील पैशांच्या सुरक्षिततेबाबत नागरिकांच्या मनांत शंका निर्माण झाली. बँकेच्या विश्वासर्हतेवरही प्रश्नचिन्ह उभे राहीले. तसंच हा प्रकार मीडिया माध्यमांतून समोर आल्यानंतर बँकेचीही नाचक्की झाली. मात्र या प्रकरणी आता बँकेने आपले निवेदन सादर करुन स्पष्टीकरण दिले आहे.
बॅंक ऑफ बडोदा ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, वडोदरा येथील प्रताप नगर शाखेमध्ये झालेला प्रकार अनैसर्गिक आहे. एका ग्राहकाच्या बचतीमधील काही रक्कमेला वाळवी लागली. बँक ऑफ बडोदाने या प्रकरणी त्वरीत पाऊलं उचलली असून कोणतेही काळजी करण्याचे कारण नाही, असे म्हणत बँकेने ग्राहकांना आश्वस्त केले आहे. तसंच अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून शाखेचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. संबंधित ग्राहकाने केलेल्या तक्रारीची आम्ही नोंद घेतली असून त्यासंदर्भात त्वरीत पाऊलं उचलून लवकरच योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही बँकेने म्हटले आहे. (बॅंकेच्या लॉकर मध्येही पैसा सुरक्षित नाही; गुजरातच्या वडोदरा मधील Bank of Baroda मध्ये वाळवी लागल्याने व्यक्तीने गमावले 2.20 लाख रूपये!)
गुजरातच्या वडोदरा येथे बॅंक ऑफ बडोदा च्या प्रताप नगर शाखेत Rehna Qutubddin Desarwal या व्यक्तीने 2.20 लाख रुपयांची रक्कम लॉकरमध्ये ठेवली होती. ही रक्कम वाळवीने खाल्ल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्याने पैसे परत मिळावेत यासाठी बँकेकडे मागणी केली होती. दरम्यान, या प्रकारनंतर बँकेच्या ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आणि पैशांच्या सुरक्षिततेवरही प्रश्न उभे राहीले. परंतु, बँकेने निवेदन जाहीर करत ग्राहकांना काळजी न करण्याचे आवाहन केले आहे. तसंच ग्राहकाचे पैसे परत करण्यासंबंधित ही बँक सकारात्मक पाऊलं उचलत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.