नुकतेच कर्नाटकमध्ये बेंगळूरूसह (Bengaluru) अनेक जिल्ह्यांना पावसाने चांगलेच झोडपले. या पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पूर आला होता. आता आऊटर रिंग रोड कंपनीज असोसिएशन (Outer Ring Road Companies Association) कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना पत्र सादर केले आहे. यात म्हटले आहे की, बेंगळुरूमधील आऊटर रिंग रोडला नुकत्याच आलेल्या पुरामुळे 225 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. आऊटर रिंग रोड कंपनीज असोसिएशन हे आऊटर रिंग रोड विभागावरील सर्व प्रमुख आयटी आणि बँकिंग कंपन्यांचे प्रतिनिधित्व करते.
पत्रात नमूद केले आहे की, ‘ओआरआरवर 30 ऑगस्टला आलेल्या पुरामुळे 225 कोटी रुपयांचे नुकसान झाले, कारण कंपन्यांचे कर्मचारी 5 तासांहून अधिक काळ रस्त्यावर अडकले होते. ओआरआरवरील अपुऱ्या पायाभूत सुविधांनी आता संकटाची पातळी गाठली आहे. जरी इथल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी केवळ 30 टक्केच कर्मचारी कामावर येत असले तरी, पायाभूत सुविधांच्या अभावामुळे बेंगळुरू शहराची पुढील वाढ हाताळण्याच्या क्षमतेवर चिंता निर्माण झाली आहे.’ या ठिकाणी अनेक मोठ मोठ्या कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे.
पत्रात पुढे असेही नमूद केले आहे की, ‘आयटी कॉरिडॉरमधील खराब पायाभूत सुविधा कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि कल्याण धोक्यात आणत आहेत.’ असा अंदाज आहे की सेंट्रल सिल्क बोर्ड आणि केआरपुरम कॉरिडॉर दरम्यान आऊटर रिंग रोडवर अर्धा दशलक्षाहून अधिक व्यावसायिक कार्यरत आहेत आणि विविध सहाय्य सेवा आणि अप्रत्यक्ष रोजगारांसह, सुमारे 17 किमीचा हा कॉरिडॉर 10 लाख लोकांना रोजगार देत आहे. (हेही वाचा: 'रोना-धोना बंद करून दिवसाचे 18 तास काम करा'; CEO Shantanu Deshpande चा फ्रेशर्सना सल्ला, सोशल मिडियावर ट्रोल)
29 आणि 30 ऑगस्ट रोजी रात्रभर पडलेल्या पावसामुळे बेलांदूर आणि सर्जापूरमधील बाह्य रिंगरोड जलमय झाला होता. त्यानंतर हे पत्र पाठवण्यात आले आहे. असोसिएशनने मुख्यमंत्र्यांना कॉरिडॉरमधील पायाभूत सुविधांमधील विद्यमान तफावतीचा आढावा घेण्याची विनंती केली. तसेच व्हाईटफील्ड आणि इलेक्ट्रॉनिक सिटी मेट्रो लाईनसाठी 2020 ची अंतिम मुदत पूर्ण न झाल्याने या भागातील मेट्रो प्रकल्पाला गती देण्याची विनंती देखील करण्यात आली आहे.