दिवंगत माजी अर्थमंत्री व भाजपा नेते अरुण जेटली (Arun Jaitley) यांच्या पत्नी संगीता जेटली (Sangita Jaitley) यांनी नुकतेच उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू (Venkaiha Naidu) यांना पत्र लिहून अरुण जेटली यांच्या पेन्शन संदर्भात एक खास इच्छा व्यक्त केली आहे. जेटलींचे पेन्शन हे राज्यसभेतील चौथ्या श्रेणीतील कमी पगारावर काम करणाऱ्या आणि सर्वात गरजू कर्मचाऱ्यांना वाटण्यात यावे असे संगीता यांनी म्हंटले आहे. या पत्राची एक प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा पाठवण्यात आली आहे. या पेन्शनच्या रक्कमेतून गरजू लोकांच्या भल्यासाठी व त्यांना आर्थिक दृष्ट्या मदत करण्यासाठी योगदान दिल्यास हीच जेटली यांना खरी श्रद्धांजली असे असे संगीता यांनी सांगितले आहे.
अरुण जेटली यांनी दोन दशकांच्या कालावधीत संसदेत काम केले आहे, ते एक शांत राहून परोपकार करणारे व्यक्ती होते, आज जर का जेटली जिवंत असते तर त्यांना सुद्धा हा निर्णय नक्कीच पटला असता त्यामुळे संसदेतील सर्वात गरजू अशा कर्मचाऱ्यांच्या विकासासाठी ही रक्कम वापरली जावे असे संगीता यांच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
अरुण जेटली यांचे 24 ऑगस्ट रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झाले होते. जेटली हे लोक नेते नसले तरी त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे त्यांना भारतीय राजकारणात विशेष स्थान होते, साहजिकच्या त्यांच्या निधनानंतर ही मोठी पोकळी निर्माण झाली होती. नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या टर्म मध्ये जेटली यांनी अर्थमंत्री म्ह्णून जबाबदारी स्वीकारली होती, मात्र कालांतराने त्यांची प्रकृती खालावल्याने दुसऱ्या वेळी मोदी निवडून आल्यावर त्यांनी आपल्याला मंत्रिमंडळात सामील न करण्याची विनंती केली होती.