राम मंदिर- बाबरी मस्जिद प्रकरण: सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीचा शेवटचा आठवडा, अयोद्धा मध्ये कलम 144 लागू
File image of Babri Masjid and Supreme Court | (Photo Credits: PTI)

Ram Janmbhoomi-Babri Masjid Land Dispute:  उत्तर प्रदेशमधील अयोध्या (Ayodhya) जिल्ह्यात कलम 144 (Section 144) लागू करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने 10 डिसेंबरपर्यंत कलम 144 लागू असेल असे सांगितले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रामजन्मभूमी संदर्भातील वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. ही सुनावणी सध्या अखेरच्या टप्प्यात पोहोचली आहे. त्यामुळेच जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे डीएम अनुज कुमार झा यांनी सांगितले. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णय अपेक्षीत आहे. त्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच शांतता राखण्याच्या दृष्टीने कलम 144 लागू करण्यात आले.

17 ऑक्टोबर पूर्ण होणार सुनावणी

मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेला राम मंदीर, बाबरी मस्जिदचा वाद प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. दसर्‍याची सुट्टी संपल्यानंतर आज (14 ऑक्टोबर) पासून पुन्हा न्यायालयाच्या कामकाजाला सुरूवात झाली आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुरू असलेल्या सुनावणीमध्ये मुस्लिम पक्ष 14 ऑक्टोपर्यंत तर 15-16 ऑक्टोबर दिवशी हिंदू पक्ष उत्तर देणार आहे. 17 ऑक्टोबर नंतर सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. या सुनावणीला 6 ऑगस्ट पासून सुरूवात करण्यात आली आहे.

दरम्यान विश्व हिंदू परिषदेकडून यंदा भव्य दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान रामजन्मभूमीच्या विवादीत जागेवर जर हिंदूंना दिवाळी साजरी करण्याची परवानगी मिळाली तर मुस्लिम समाजही या विवादीत जागेवर नमाज पडण्यासाठी मागणी करेल असे मुस्लिम पक्षकारांकडून सांगण्यात आले होते. या वादाच्या पार्श्वभूमीवर आता अयोद्धेमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे.

कलम 144 लागू केलेल्या जागेवर 5 पेक्षा अधिक लोक जमू शकत नाहीत, शस्त्र घेऊन जाऊ शकत नाहीत. तसेच या नियमाची पायमल्ली करणार्‍यांवर पोलिस कारवाई करू शकते. आरोपींना वर्षभराचा तुरूंगवासही भोगावा लागतो.