1993 साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील मोस्ट वान्टेड आरोपींपैकी अबू बकर (Abu Bakar) आणि फिरोज ( Firoz) यांना अटक करण्यात आली आहे. 1993 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात यांचा मोठा हात होता. अबू बकरने पाकव्याप्त काश्मिरमध्ये ट्रेनिंग घेतले होते. RDX आणण्यात आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या कटात त्याचा मुख्य सहभाग होता. बॉम्बस्फोटानंतर भारतीय तपास यंत्रणा अबू बकरचा शोध घेत होत्या. मात्र 25 वर्षानंतर अबू बकरला अटक करण्यात भारतीय तपास यंत्रणांना यश आले आहे.
1997 साली अबू बकर विरोधात रेड कॉर्नर नोटिस जारी करण्यात आली होती. अबू बकरचे पूर्ण नाव अबू बकर अब्दुल गफूर शेख आहे. अबू बकर आणि मुस्तफा दौसा हे दोघेही पूर्वी मुंबईत स्मगलिंग करत होते. अबू बकरने इराणी महिलेशी दुसरा विवाह केला आणि त्यानंतर तो दुबई आणि पाकिस्तानात राहू लागला. अटकेनंतर भारतीय तपास यंत्रणा अबू बकरला मुंबईत आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
12 मार्च 1993 रोजी दुपारनंतर मुंबईतील अनेक भागात एकूण 13 बॉम्बस्फोट झाले. या साखळी बॉम्बस्फोटात एकूण 257 लोकांचा मृत्यू झाला होता. तर 700 हून अधिक लोक जखमी झाले होते. यापूर्वी 1993 साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात आरोपी अहमद मोहम्मद लंबू याला गुजरात एटीएसने अटक केली होती. अहमद लंबू हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निटवर्तीय मानला जातो.