Nepal Flood Update: भारताच्या शेजारील देश नेपाळ सध्या मुसळधार पावसामुळे अनेक अडचणींचा सामना करत आहे. पूर आणि भूस्खलनाच्या घटनांमुळे देशाच्या पूर्व आणि मध्य भागात मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. तेथील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर आणि भूस्खलनामुळे नेपाळमध्ये आतापर्यंत 170 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर, 42 जण बेपत्ता आहेत. शुक्रवारी आणि शनिवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर काठमांडूची मुख्य नदी बागमती धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. परिस्थिती पाहता प्रशासनाने तीन दिवस सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवली आहेत.
पुरात अडकलेल्या लोकांची सुटका
गृह मंत्रालयाचे प्रवक्ते ऋषीराम पोखरेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात पुरामुळे झालेल्या घटनांमध्ये 111 जण जखमी झाले आहेत. पोखरेल यांनी माहिती दिली की, सर्व सुरक्षा यंत्रणांच्या मदतीने शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. आत्तापर्यंत लष्कराकडून देशभरात अडकलेल्या 162 लोकांना एअरलिफ्ट केले गेले आहे. याशिवाय नेपाळी लष्कर, पोलीस आणि पोलीस दलाच्या जवानांनी बाधित भागातून 4,000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. दूर्घटनाग्रस्त भागातील लोकांना अन्नधान्यासह सर्व आवश्यक मदत साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. (हेही वाचा: Delhi Shocker: दिल्लीतील तिग्री भागात 22 वर्षीय तरुणाची हत्या, 19 वर्षीय संशयिताला घेतले ताब्यात)
भूस्खलनामुळे राष्ट्रीय महामार्ग विस्कळीत होत आहेत
भूस्खलन आणि पूर स्थितीमुळे अनेक राष्ट्रीय महामार्ग विस्कळीत झाले आहेत. त्यामुळे शेकडो लोक ठिकठिकाणी अडकून पडले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरामुळे नेपाळमध्ये किमान 322 घरे आणि 16 पुलांचे नुकसान झाले आहे.
बसवर दरड कोसळली
काठमांडूच्या सीमेला लागून असलेल्या धाडिंग जिल्ह्यात भूस्खलनात बस दबल्याची घटना घडली.या घटनेत 19 जणांचा मृत्यू झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. भक्तपूर शहरात दरड कोसळल्याने घर कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. मकवानपूर येथील 'ऑल इंडिया नेपाळ असोसिएशन' संचालित प्रशिक्षण केंद्रात भूस्खलनाच्या घटनेत सहा फुटबॉल खेळाडूंनी आपला जीव गमावला. अनेक जण पुराच्या पाण्यात वाहून गेले. दरम्यान, मंगळवारपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी रविवारी मात्र काहीसा दिलासा मिळाला होता.