Ayodhya's New International Airport (PC - X/@rajeshkalra)

Ayodhya's New International Airport: अयोध्या रेल्वे स्थानकानंतर (Ayodhya Railway Station) आता अयोध्या विमानतळाचे (Ayodhya Airport) नावही बदलण्यात आले आहे. अयोध्या विमानतळाला आता महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ (Maharishi Valmiki International Airport) अयोध्या धाम असे नाव देण्यात आले आहे. वृत्तसंस्था एएनआयने गुरुवारी संध्याकाळी सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली. रामायणाचे लेखक महर्षी वाल्मिकी यांच्या नावावरून हे नाव देण्यात आलं आहे. वृत्तानुसार, या विमानतळाचे नाव 'महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धाम' असे असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 डिसेंबर रोजी या नवीन विमानतळाचे उद्घाटन करणार आहेत. शनिवारी अयोध्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी तेथील पुनर्विकसित रेल्वे स्टेशनचे उद्घाटन करतील आणि नवीन अमृत भारत आणि वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील.

पीएम मोदी त्यांच्या अयोध्या दौऱ्यात हजारो कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनही करतील. पीएमओने दिलेल्या माहितीनुसार, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 डिसेंबर रोजी अयोध्या, उत्तर प्रदेशला भेट देणार आहेत. ते सकाळी 11.15 वाजता पुनर्विकसित अयोध्या रेल्वे स्टेशनचे उद्घाटन करतील. यासोबतच ते नवीन अमृत भारत ट्रेन आणि वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. ते इतर अनेक रेल्वे प्रकल्पही राष्ट्राला समर्पित करणार आहेत. दुपारी 12:15 वाजता पंतप्रधानांच्या हस्ते नव्याने बांधण्यात आलेल्या अयोध्या विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. (हेही वाचा - Ram Mandir: प्राणप्रतिष्ठादरम्यान केवळ 5 जणांना गर्भगृहात प्रवेश दिला जाणार; पंतप्रधान मोदींसोबत आणखी कोण असणार? जाणून घ्या)

यानंतर पंतप्रधान एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील, जिथे ते 15,700 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. तथापी, यात अयोध्या आणि त्याच्या आसपासच्या परिसराच्या विकासासाठी सुमारे 11,100 कोटी रुपयांचे प्रकल्प आणि उत्तर प्रदेशातील इतर प्रकल्पांशी संबंधित सुमारे 4600 कोटी रुपयांचे प्रकल्प समाविष्ट आहेत.

अयोध्या विमानतळ अनेक सुविधांनी सुसज्ज -

पीएमओने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अयोध्येतील अत्याधुनिक विमानतळाचा पहिला टप्पा 1,450 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून विकसित करण्यात आला आहे. विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे क्षेत्रफळ 6500 चौरस मीटर असेल, जे दरवर्षी सुमारे 10 लाख प्रवाशांना सेवा देण्यासाठी सज्ज असेल. टर्मिनल इमारतीचा दर्शनी भाग अयोध्येतील आगामी श्री राम मंदिराचे मंदिर वास्तुकला दर्शवितो. टर्मिनल इमारतीच्या आतील भागात स्थानिक कला, चित्रे आणि भगवान श्री रामाचे जीवन दर्शविणारी भित्तीचित्रे सजलेली आहेत. अयोध्या विमानतळाची टर्मिनल इमारत विविध सुविधांनी सुसज्ज आहे. ज्यात इन्सुलेटेड रूफिंग सिस्टीम, एलईडी लाइटिंग, रेन वॉटर हार्वेस्टिंग, कारंज्यांसह लँडस्केपिंग, वॉटर ट्रीटमेंट प्लांट, सीवेज ट्रीटमेंट प्लांट, सोलर पॉवर प्लांट यांचा समावेश आहे.

पुनर्विकसित अयोध्या रेल्वे स्थानकाचा पहिला टप्पा 240 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आला आहे. अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्टेशन म्हणून ओळखले जाणारे 3 मजली आधुनिक रेल्वे स्थानक लिफ्ट, एस्केलेटर, फूड प्लाझा, पूजा गरजांसाठी दुकाने, क्लोक रूम, चाइल्ड केअर रूम, वेटिंग हॉल यासारख्या सुविधांनी सुसज्ज आहे.