मनेका गांधी (Photo Credit: PTI)

सध्या भारतात धुमाकूळ घालत असलेल्या #MeToo वादळाने विविध क्षेत्रातील मान्यवरांना झोडपून काढले आहे. रोज नवनवीन बाहेर पडणाऱ्या धक्कादायक नावांमुळे महिलांवरील अत्याचारांची मुळे किती खोलवर रुजली आहेत, आणि या मुद्द्याला कधीच कुणी गांभीर्याने घेतले नसल्याचे लक्षात येते. मात्र सध्या नाना पाटेकरांवर एका अभिनेत्रीने लावलेल्या आरोपांमुळे हे चित्र पलटत असल्याचे दिसते. या अभिनेत्रीने सुरु केलेला लढा इतर महिलांसाठी प्रेरणादायी ठरला आणि यांचा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचला. म्हणूनच आता, #MeToo चळवळीतून पुढे आलेल्या घटनांच्या तपासणीसाठी केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडून समिती स्थापन केली जाणार आहे.

केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी आज सरकार#MeToo मोहिमे अंतर्गत नोंदविण्यात आलेल्या तक्रारींची सुनावणी करण्यासाठी 4 सेवानिवृत्त न्यायाधीशांची समिती स्थापन करणार असल्याची माहिती दिली. तसेच #MeToo च्या माध्यमातून लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या प्रत्येक महिलेवर माझा विश्वास आहे, असेही मनेका गांधी म्हणाल्या.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराला काही प्रमाणात का होईना पण आळा बसण्याची शक्यता आहे, तसेच इथून पुढे कोणत्याही महिलेसोबत गैरवर्तन करण्याआधी पुरुष दहा वेळा विचार करेल असाही विश्वास व्यक्त केला जात आहे.