महिलेला वशमध्ये करण्यासाठी घुबडाचा बळी, प्रत्यक्षात वडिलांना गमावले
घुबडाचा बळी ( फोटो सौजन्य -Pixabay)

दिल्लीमध्ये अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या एका व्यक्तीने महिलेला वश मध्ये करण्यासाठी घुबडाचा बळी दिला. मात्र या प्रकरणी महिला ही वशमध्ये आली नाही आणि वडिलांना या व्यक्तीमुळे त्यांचा जीव गमवावा लागल्याची विचित्र घटना घडली आहे.

कन्हैया लाल असे या विवाहित पुरुषाचे नाव आहे. तो दिल्लीतमधील सुलतानपुरी के सी ब्लॉक येथे राहत असून त्याला त्याच्या घराजवळ राहणारी एक महिला आवडू लागली होती. या प्रकरणी त्याने महिलेशी संवाद साधण्याचा खूप वेळा प्रयत्न केला.  परंतु ही महिला कन्हैयाला वारंवार टाळत होती. त्यामुळे कन्हैयाने तिला वश मध्ये करण्यासाठी मांत्रिकाच्या सहाय्याने घुबडाच्या पिसांमध्ये तिचे केस रोवण्यास सांगितले. त्याप्रमाणे कन्हैयाने साल्याला घुबड आणून देण्यास सांगितले.

या प्रकरणी दिवाळीच्या पहिल्या पहाटेच्या रात्री महिलेला वशमध्ये करण्याचे ठरविले होते. त्याप्रमाणे कन्हैयाने पूजा करण्यास सुरुवात केली. मात्र शेजाऱ्यांना त्याच्या या पूजेबद्दल संशय आल्याने त्यांनी कन्हैयाची पोलिसात तक्रार केली. त्यावेळी पोलिसांनी घटनास्थळी पोहचून घरामधील बंद खोलीत त्यांना मानवी कवटी, हाडे, तंत्र-मंत्राचे सामान अशा विचित्र गोष्टी दिसून आल्या. त्याचबरोबर पोलिसांना कन्हैयाच्या वडिलांचा मृत देह आणि कूलरमध्ये मेलेले घुबड दिसले. या घटनेची चौकशी केली असता कन्हैयाने महिलेला वश करण्यासाठी हा सर्व प्रकार केल्याचे पोलिसांना सांगितले आहे.