दिल्ली सरकारने रविवारी पोलिसांना आदेश देत असे म्हटले आहे की, इंडिगो (IndiGo), विस्तारा (Vistara), स्पाइस जेट (Spice Jet) आणि एअरएशियाच्या (AirAsia) विरोधात एफआयआर दाखल करावा. कारण महाराष्ट्रातून उड्डाण करणाऱ्यांनी निगेटिव्ह आरटी-पीसीआर नियमांचे उल्लंघन केले असून त्यांनी या विमानसेवेतून प्रवास केला आहे. परंतु विमानसेवेकडून असे स्पष्टीकरण देत असे म्हटले आहे की, त्यांच्याकडून सर्व नियमांचे पालन केले जात आहे. तसेच रविवारी संध्याकाळ पर्यंत कोणताही एफआयआर त्यांच्यापर्यंत पोहचलेला नाही.(COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत उच्चांकी 2,73,810 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; 1,619 मृत्यू)
मोठ्या संख्येने महाराष्ट्रातून प्रवासी हे दिल्लीत आरटी-पीसीआर रिपोर्ट्स शिवाय प्रवास करत असल्याचे दिसून आले. त्यामुळे आयजीआय एअरपोर्टचे एसएचओ यांना इंडिगो, स्पाइस जेट, विस्तारा आणि एअर एशियाच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यासाठी पत्र लिहिण्यात आले आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या नागरिकांकडे वैध आरटी-पीसीआर रिपोर्ट्स सुद्धा नव्हते असे ही पत्रात लिहिल्याचे दिल्ली सरकारने रविवारी केलेल्या एका विधानात म्हटले आहे.
महाराष्ट्रातून दिल्लीत येणाऱ्या प्रवाशांना 72 तासांपूर्वीचे आरटी-पीसीआर चाचणीचे रिपोर्ट्स असावेत. त्याचसोबत ज्यांकडे हे रिपोर्ट्स नसणार त्यांना 14 दिवस क्वारंटाइन रहावे असे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रत्येक राज्याने त्यांच्याकडे दुसऱ्या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर चाचणी आणि क्वारंटाइन संबंधित नियम लागू केले आहेत.(गरज नसलेल्या रुग्णांना ऑक्सिजन लावून त्याचा अपव्यय करू नका- पियुष गोयल)
इंडिगो विमानसेवेच्या एका प्रवक्तांनी असे म्हटले आहे की, त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या FIR बद्दल त्यांना कोणतीच नोटीस आलेली नाही. तर एअर एशिया यांनी स्पष्ट केले की, आम्ही प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करत असून आम्हाला सुद्धा एफआयआर बद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही. परंतु अद्याप विस्तारा आणि स्पाइस जेट यांच्याकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.