Sunburn Festival 2018 : सनबर्नमध्ये कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाविरोधात कोर्टात याचिका दाखल
सनबर्न फेस्टिव्हल (Photo credit : youtube)

नववर्षाच्या स्वागतासाठी पुण्यात लोकप्रिय अशा सनबर्न फेस्टिव्हल (Sunburn Festival)चे आयोजन करण्यात आले आहे. 29 ते 31 डिसेंबर या कालावधीत पुण्यातल्या बावधान लवळे येथे असलेल्या ऑक्सफोर्ड गोल्फ क्लबवर यंदाचा सनबर्न फेस्टिव्हल पार पडणार आहे. मात्र त्याआधी या फेस्टिवल संदर्भात हायकोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. फेस्टिव्हलमध्ये होणाऱ्या ध्वनीप्रदूषणासंदर्भात ही याचिका आहे. ध्वनीप्रदूषणाचे नियम पाश्चिमात्य सणांनाही लागू करा, फक्त भारतीय सणांवरच बंधने का? असह प्रश्न अमोल बालवडकर यांनी उपस्थित केला आहे. बुधवारी याबाबत कोर्टात सुनावणी झाली, आता पुढची सुनावणी शुक्रवारी होणार आहे.

दिवाळीच्या कालावधीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने सण आणि उत्सवांमध्ये ध्वनीप्रदूषणासंदर्भात काही नियम लागू केले. यामध्ये फक्त रात्री 8 ते 10 या वेळेत लाऊडस्पीकर आणि फटाके उडवण्यास संमती दिली आहे. असे असताना आंतरराष्ट्रीय म्युझिक फेस्टमध्ये दुपारी तीन वाजल्यापासून मध्यरात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात डॉल्बी साऊंड आणि डीजे सुरु असतो. याबाबत आक्षेप घेतला गेला आहे. वेळेची मर्यादा आणि डेसिबलची पातळी सनबर्नसारख्या फेस्टिव्हल्सनाही लागू करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

सनबर्न फेस्टिव्हल शहरापासून थोड्या लांब अंतरावर होत आहे, हे शांतता क्षेत्र नसले तरीही ध्वनी मर्यादा आणि पर्यावरणाचे नुकसान होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत हायकोर्टाने मांडले आहे. तसेच कार्यक्रमाचे आयोजन होत असलेल्या ठिकाणापासून लोकवस्ती किती दूर आहे? असा सवाल करत या याचिकेवरची पुढची सुनावणी शुक्रवारी होणार आहे.