प्रेम आंधळे असते, खरे प्रेम अगदी शेवटपर्यंत घेऊन जाण्यासाठी अनेक आणाभाका घेतल्या जातात. मरेपर्यंत एकत्र राहण्याच्या शपथा घेतल्या जातात. मात्र मिशिगन येथील एक प्रेयसी याहीपेक्षा अनेक पावले पुढे गेली, की चक्क ती आपल्या प्रियकराच्या मृत शरीरासोबत राहू लागली. तब्बल 1 महिना ही महिला या डेड बॉडीसोबत होती, आणि या गोष्टीची कोणाहीला कल्पना नव्हती. अँजेला शॉक (Angela Shock), वय 49 असे या महिलेचे नाव आहे.
आपल्या 61 वर्षीय प्रियकराचा मृत्यू झाल्यावर तिने या गोष्टीची कोणालाही कल्पना दिली नाही. कुठे तक्रार केली नाही की कुठे वाच्चता केली नाही. त्यानंतर या व्यक्तीच्या कुटुंबीयांनी तो गायब असल्याची तक्रार पोलिसांकडे केली, आणि पोलिसांनी तपास सुरु केला. पोलीस जेव्हा अँजेलाच्या घरी पोहचले तेव्हा दारातच कुजलेल्या शरीराचा वास आला. घरात पाय ठेवताच समोरच खुर्चीवर बसलेली या व्यक्तीची बॉडी दिसून आली. त्यावेळी अँजेलाने त्याचे काही आठवड्यांपूर्वी निधन झाल्याचे सांगितले. या दरम्यान ती त्याचे बँक कार्डचा वापर करत असल्याचे आढळले.
या व्यक्तीला बँकेकडून काही फायदे मिळत होते, त्यामुळे या महिलेने त्याचे निधन झाल्यावरही त्याच घरात राहणे पसंत केले. पोलिसांनी या व्यक्तीचा मृत्यू हा नैसर्गिक असल्याचे सांगितले. पोलिसांनी अँजेला विरोधात गुन्हा नोंदवला आहे. अँजेलाची पार्श्वभूमी ही गुन्हेगार प्रवृत्तीची आहे, याआधी तिच्यावर चोरी, घराची तोडफोड, मालमत्ता नष्ट करणे यांसारखे आरोप आहेत. घरगुती हिंसाचाराच्या आरोपावरून न्यायालयात उपस्थित न झाल्यामुळे तिच्याविरुद्ध अटक वॉरंटही जरी केला होता.