भारतामध्ये मागील वर्षी मार्च महिन्यापासून सुरू झालेला कोविड 19 चा धुमाकूळ अद्यापही थांबलेला नाही आणि त्यामध्ये आता तिसर्या लाटेचीही शक्यता बोलून दाखवली असल्याने यंदाही सारे सण घरात राहूनच किंवा सुरक्षित अंतर पाळूनच साजरे करावे लागणार अशी लक्षणं आहेत. गुढीपाडव्यानंतर आता 14 मे दिवशी साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा शुभ दिवस म्हणजे अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya) आहे. अक्षय्य तृतीयेला अनेकजण सोनं खरेदीला पसंती देतात. साधारण उन्हाळ्याच्या दिवसात अक्षय्य तृतीया असल्याने याच काळातील लग्न सराईमधील धामधुमीचा देखील काळ पाहून अनेक जण हमखास सोनं खरेदीसाठी अक्षय्य तृतीयेला बाहेर पडतात. ( नक्की वाचा: Akshay Tritiya 2021: अक्षय तृतीयेच्या दिवशी 'या' शुभ मुहूर्तावर खरेदी करा सोनं; जाणून घ्या सविस्तर).
यंदा कोरोनाचं संकट अद्याप दूर झालेले नाही आणि ब्रेक द चेन अंतर्गत नियमावली कडक असल्याने दुकानं ठराविक वेळेच्या पलिकडे खुली ठेवणं शक्य नाहीत. त्यामुळे यंदा अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीसाठी तुम्हांला घराबाहेर न पडता देखील सोनं खरेदीसाठी काही पर्याय उपलब्ध आहेत. जाणून घ्या यंदा घरात राहुनच सोनं खरेदी कसं कराल?
सराफाच्या वेबसाईटवर ऑनलाईन खरेदी
कोरोना संकटामुळे आता आपण केवळ फळं, भाजी यांची ऑनलाईन खरेदी करायला नाही शिकलो तर सोन्याची खरेदी देखील ऑनलाईन करण्यासाठी आता तुमच्या सराफा दुकानदारांनी खास सोय उपलब्ध केली आहे. महाराष्ट्रात अनेक अग्रणी असलेल्या ज्वेलर्सची वेबसाईट आहे. तेथे दागिने, सोन्याचं वळं, बिस्कीट ऑनलाईन खरेदी करता येऊ शकतं.
आता खरेदी करा नंतर घेऊन जा
भारतामध्ये अनेक ठिकाणी सध्या लॉकडाऊन असल्याने नागरिकांच्या एका ठिकाणावरून दुसर्या ठिकाणी जाण्यावर बंदी आहे. म्हणूनच ज्वेलर्सने शुभ पाहून रीत म्हणून सोनं खरेदी करा आणि लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर तुमची वस्तू घेऊन जा असा पर्याय दिला आहे.
डिजिटल प्लॅटफॉर्म वर सोनं खरेदी
आजकाल डिजिटल प्लॅटफॉर्मदेखील सहज सोनं खरेदीचे पर्याय उपलब्ध आहेत. पेटीएम, गूगल पे अशा डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
गोल्ड बॉन्ड्स
आजकाल फिजिकल गोल्ड ऐवजी गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवणूक करणं हा देखील एक चांगला पर्याय आहे. BSE आणि NSE च्या माध्यमातून ही सोनं खरेदी करता येऊ शकते. अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपलेल्या अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर आता सोन्याचे भाव उतरलेले असताना सोन्याची खरेदी करण्याची ही एक चांगली संधी आहे.
भारतामध्ये कोरोना संक्रमण रोखण्यासाठी आता लसीकरण मोहिम सुरू केली आहे पण लसीच्या तुटवड्यामुळे अद्याप लस सर्वांपर्यंत पोहचणं शक्य नसल्याने तूर्तास घरी राहूनच सुरक्षित राहणं हितकारी आहे त्यामुळे सोनं खरेदीला अशा परिस्थितीत बाहेर पडून जीव धोक्यात घालण्यापेक्षा घरीच सोनं खरेदीचे हे पर्याय नक्की यंदा आजमावून पहा.