
काही दिवसांपूर्वी सोन्या-चांदीच्या दराने (Gold Silver Rate) 1 लाखाचा टप्पा गाठल्यानंतर आता पुन्हा सोन्याचे दर खाली घसरले आहेत. आगामी अक्षय्य तृतीया आधी हे सोन्या-चांदीचे दर घसरणं सामान्यांना दिलासा देणारं आहे. येत्या 30 एप्रिल दिवशी हिंदू धर्मीयांसाठी खास असलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेचा (Akshaya Tritiya) सण आहे. या सणाच्या निमित्ताने अनेक जण सोन्या-चांदीची खरेदी करतात. अक्षय्य तृतीया हा सण समृद्धी, भरभराट घेऊन येते अशी हिंदू धर्मीयांची धारणा आहे. बहुतेक लोक भविष्यात संपत्ती आणि समृद्धीचे स्वागत करण्यासाठी सोने खरेदी करतात. असेही मानले जाते की या दिवशी खरेदी केलेले सोने कधीही कमी होत नाही आणि ते वाढतच राहते किंवा त्याचे मूल्य वाढतच राहते.
इंडियन बुलियन असोसिएशन (IBA) च्या आजच्या (28 एप्रिल) माहितीनुसार, 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्राम, 95,280 रूपये आहे तर 22कॅरेट सोन्याची किंमत 10 ग्रॅम साठी ₹87,340 आहे. IBA वेबसाइटनुसार, 28 एप्रिलला चांदीची किंमत प्रति किलो ₹96,690 आहे.
अधिकृत वेबसाइटवरील आकडेवारीनुसार, 28 एप्रिलला आज Gold MCX prices प्रति 10 ग्रॅम ₹95,032 रुपये आहेत ज्यामध्ये प्रति 10 ग्रॅम 40 रुपयांची वाढ झाली आहे. एमसीएक्सच्या चांदीच्या किमती प्रति किलो 243 रुपयांनी घसरून ₹96,198/kg झाल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान विविध भागांमध्ये उत्पादन शुल्क कर, मेकिंग चार्जेज यांच्यामध्ये बदल होत असल्याने आणि ते वेगळे असल्याने सोन्याची मोजावी लागणारी किंमत वेगळी आहे. नक्की वाचा: Gold Rate Prediction On Akshaya Tritiya 2025: 1 लाख रुपयांचा टप्पा गाठल्यानंतर अक्षय्य तृतीयामुळे सोन्याच्या किमती आणखी वाढतील का? काय आहे तज्ञांचे मत? जाणून घ्या.
आजकाल सोन्यामध्ये गुंतवणूक ही केवळ दागिन्यांपुरती मर्यादित राहिलेली नाही. सोन्यामधील गुंतवणूकीचे वेगवेगळे ऑनलाईन, ऑफलाईन पर्याय खुले आहेत. त्यामुळे आता साडेतीन मुहूर्ताचा फायदा घेत तुम्ही भविष्याचा विचार करूनही सोन्यात गुंतवणूक करू शकता.
सोन्याचे दागिने घेताना काय लक्षात ठेवाल?
सोन्याची शुद्धता ही 24 कॅरेट सोन्यामध्ये असली तरीही त्यामध्ये दागिने बनवता येऊ शकत नाहीत. दागिन्यांसाठी 22 कॅरेट किंवा 18 कॅरेट सोन्यामध्येच दागिने घडवले जातात. सरकारच्या नियमांनुसार, सोन्यावर आता हॅलमार्क अनिवार्य आहे त्यामुळे ते देखील पाहूनच सोनं खरेदी करायला हवं.