Heavy fog (Photo Credits: ANI)

Weather Update: पर्वतांवर झालेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये थंडी वाढली आहे. येत्या दोन दिवसांत राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक भागात कडाक्याची थंडी पडणार आहे. उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड, पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये दोन दिवस थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने अलर्ट जारी करताना म्हटले आहे. याशिवाय तीन दिवस सकाळ आणि संध्याकाळी या भागात दाट धुके पडण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, शनिवारी दिवसभराचा पारा घसरल्याने दिल्लीतील काही भागात थंडीची नोंद झाली. दिल्ली-एनसीआरमध्येही आजची सकाळ धुक्याने सुरू झाली. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 24 तासांत सकाळी धुके पडून दिवसभर हवामान निरभ्र राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 8 फेब्रुवारी रोजी हलका पाऊस पडू शकतो.

IMD च्या म्हणण्यानुसार, येत्या 15 फेब्रुवारीपर्यंत हवामान फारसे उष्ण असणार नाही. कारण एकामागून एक येणाऱ्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा थेट परिणाम उत्तर भारताच्या हवामानावर होत आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी सुरूच -

हवामान खात्याने सांगितले की, 6 फेब्रुवारीला म्हणजेच आज गिलगिट मुझफ्फराबाद, लडाख, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंडमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस पडू शकतो. काही भागात हिमवृष्टीही होऊ शकते. याशिवाय दक्षिण पंजाब, हरियाणा, उत्तर राजस्थान, दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात हलका पाऊस पडेल. 8 फेब्रुवारीपासून वायव्य भारतातील किमान तापमानात पुन्हा वाढ होणार आहे.