
Gwalior Fire Breaks: मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यात गुरुवारी सकाळी तीन मजली इमारतीला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये वडील आणि दोन मुलींचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. बहोदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कैलास नगरमध्ये ही घटना घडली. विजय गुप्ता यांच्या तीन मजली घराला गुरुवारी सकाळी अचानक आग लागली. घराच्या दुसऱ्या मजल्यावर ड्रायफ्रूटचे गोदाम होते. किचनमधून सुरू झालेल्या आगीने हळूहळू उग्र रूप धारण केले. घराला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. आग आटोक्यात येण्यापूर्वीच घराची भिंत तुटली. आत तीन जणांचे मृतदेह सापडले. तिघांचाही गुदमरून मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आगीचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे सांगण्यात येत आहे. वडील आणि दोन्ही मुलींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.