धक्कादायक! पत्रकाराच्या तोंडावर लघवी करत केली बेदम मारहाण; जीआरपी इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल निलंबित (Video)
पत्रकाराला मारहाण (फोटो क्रेडिट- ANI)

समाजात अत्याचार, भ्रष्टाचार, गैरव्यवहार यांसोबतच पत्रकारांवर होत असलेल्या हल्ल्यांचे प्रमाणही वाढत आहे. आता पुन्हा एकदा एका पत्रकाराची पोलिसांकडून मारहाण झाल्याची घटना घडली आहे. उत्तरप्रदेश (Uttar Pradesh) मधील शामली (Shamli) येथे  रेल्वे रुळावरून घसरल्यानंतर ती बातमी कव्हर करण्यासाठी हा पत्रकार गेला असता, त्याला रेल्वे पोलिसांनी बेदम चोप दिला. इतकेच नाही तर या पत्रकाराच्या तोंडात जबरदस्तीने लघुशंकाही केली गेली. याबाबत एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यानंतर या पोलिसांविरुद्ध कारवाई करत, जीआरपी इन्स्पेक्टर राकेश कुमार (GRP Inspector Rakesh Kumar) आणि कॉन्स्टेबल संजय पवार (Sanjay Pawar) यांना निलंबित करण्यात आले आहे.

याबाबत पत्रकार अमित शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘काही दिवसांपूर्वी त्यांनी रेल्वेच्या जीआरपीविरोधात अवैध वॉन्डरिंगची स्टोरी चालवली होती. ज्यामुळे स्टेशनचे अधिकारी जीआरपी राकेश कुमार हे अमित शर्मा यांच्यावर चिडलेले होते. दरम्यान, शामली शहराच्या धीमानपुरा फाटकाजवळ ट्रॅक बदलताना मालगाडीचे काही डबे घसरले ही बातमी कव्हर करण्यासाठी अमित शर्मा गेले असता त्यांना राकेश कुमार यांच्या उपस्थितीत मारहाण करण्यात आली. त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला तसेच त्यांचा कॅमेराही तोडण्यात आला.

यानंतर सर्वात धक्कादायक म्हणजे, स्टेशन अधिकाऱ्यांनी अमित शर्मा यांच्या तोंडावर लघुशंका करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर DGP ओपी सिंह यांनी 24 तासांत या प्रकरणाचा रिपोर्ट मागवला आहे. तसेच रेल्वे पोलिसांच्या एसएचओ आणि कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले आहे.