Azam Khan Bail: समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आझम खान (Azam Khan) यांना अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) दिलासा मिळाला आहे. रामपूरमधील कोतवाली पोलीस ठाण्यातील एका प्रकरणात न्यायालयाने आझम खान यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने आझम खान यांना दोन आठवड्यांच्या आत संबंधित न्यायालयासमोर नियमित जामिनासाठी अर्ज करण्याची परवानगी दिली आहे. जोपर्यंत सक्षम न्यायालयाकडून नियमित जामीनावर निर्णय होत नाही तोपर्यंत अंतरिम जामीन सुरू राहील, असे न्यायालयाने सांगितले.
आझम खान यांच्यावर 80 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. ते गेल्या अनेक महिन्यांपासून सीतापूर कारागृहात वेगवेगळ्या गुन्ह्यात शिक्षा भोगत आहे. आझम खान यांच्या अंतरिम जामीनाबाबतही मंगळवारी न्यायालयात सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. (हेही वाचा - Gyanvapi Mosque Contoversy: ज्ञानवापी प्रकरणातील सुनावणीला कनिष्ठ न्यायालयात स्थगिती, उद्या सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी)
न्यायालयाने खान यांना नियमित जामिनासाठी न्यायालयात अर्ज करण्यास सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने कलम 142 द्वारे प्रदान केलेल्या विशेष अधिकारांचा वापर करून आझम खान यांना अंतरिम जामीन मंजूर केला.
आझम खान यांनी दिला खासदारकीचा राजीनामा -
आझम खान यांनी सीतापूर तुरुंगात असताना उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत रामपूर शहरातून सपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर आझम यांनी लोकसभा सदस्यपदाचा राजीनामा दिला होता.