Supreme Court of India | (Photo Credits: IANS)

No Ganesh Utsav at Idgah Maidan: कर्नाटकची राजधानी बेंगळुरू (Bengaluru) येथील ईदगाह मैदानावर (Idgah Maidan) होणाऱ्या गणेश पूजेबाबत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मोठा निर्णय दिला आहे. ईदगाह मैदानात गणेशपूजन (Ganesh Chaturthi Celebrations) केले जाणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला आहे. यापूर्वी उच्च न्यायालयाने ईदगाह मैदानावर गणेशोत्सवाला परवानगी दिली होती. त्याला मुस्लिम पक्षाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने वादग्रस्त इदगाह मैदानावर यथास्थिती कायम ठेवण्यास सांगितले आहे. सध्या येथे गणेशोत्सव होणार नाही.

इदगाह मैदानात गणेश पूजेला परवानगी दिल्यानंतर वाद निर्माण झाला होता. यानंतर मैदानाभोवती पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याप्रकरणी राज्याच्या वक्फ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. (हेही वाचा - Anna Hazare Writes to CM Kejriwal: 'AAP सत्तेच्या नशेत बुडाली', अण्णा हजारे यांची अरविंद केजरीवाल यांच्यावर पत्राद्वारे टीका)

दरम्यान, अलीकडेच उच्च न्यायालयाने राज्य सरकारला बेंगळुरू येथील चामराजपेट ईदगाह मैदानावर गणेश चतुर्थी साजरी करण्याबाबत विचार करण्यास सांगितले होते. त्यानंतर या मैदानात गणेशोत्सवासाठी राज्य सरकारने दोन दिवसांची परवानगीही दिली होती. त्यानंतर वाद निर्माण झाला. वक्फ बोर्डाने याला विरोध करत उच्च न्यायालयाच्या या निर्देशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

वास्तविक, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्यावर अंतरिम आदेशाबाबत दोन्ही न्यायमूर्तींमध्ये मतभेद झाले. त्यानंतर हे प्रकरण सरन्यायाधीशांकडे पाठवण्यात आले. सीजेआय न्यायमूर्ती यूयू ललित यांनी हे प्रकरण न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी, एमएम सुंदरेश आणि एएस ओका यांच्या खंडपीठाकडे पाठवले. यापूर्वी ईदगाह मैदानावर ज्या प्रकारे गणेश उत्सवाचे आयोजन करण्यात आले नव्हते, तशीच स्थिती कायम राहील आणि यावेळीही गणेशपूजा होणार नाही, असा निकाल याच खंडपीठाने दिला आहे.

यापूर्वी उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठाने सांगितले होते की, या मैदानाचा वापर स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी करता येईल. याशिवाय खेळाचे मैदान म्हणूनही त्याचा वापर करता येईल. याशिवाय याठिकाणी मुस्लिम समाजाचे लोक दोन्ही ईदच्या दिवशी नमाज अदा करू शकतात. नंतर खंडपीठाने आदेशात बदल करून राज्य सरकारला निर्णय घेण्याची मुभा दिली. यानंतर राज्य सरकारने गणेश चतुर्थीला मान्यता दिली होती.