लग्नात झालेला गोळीबार (Photo credits: ANI)

दिल्ली : आजकाल सार्वजनिक ठिकाणी गोळीबार होत असलेल्या घटना अनेकवेळा पाहायला मिळतात. रस्त्यावर, मॉलमध्ये झालेल्या गोळीबारात कित्येक लोक जखमी झाले आहेत. अशातच आता चक्क लग्नात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. नवी दिल्लीच्या शाकारपूर (Shakarpur) भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. इथे एक लग्नसोहळा चालला असताना, अचानक एका अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. ही गोळी नवरीच्या पायाला लागली, त्यानंतर या सोहळ्यात धुमाकूळ माजला. मात्र अशा अवस्थेतही हे लग्न पार पडले.

हा गोळीबार नक्की कोणी केला हे अद्याप समजू शकले नाही. या गोळीबारातून सुटलेली गोळी चक्क नवरीमुलीच्या पायाला लागली. ताबडतोब या नवरीला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी काळजी करण्याचे कारण नसल्याचे सांगितल्यानंतर ही नवरी मुलगी परत मंडपात आली आणि लग्न पार पडले. दरम्यान या घटनेविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याआधी दक्षिण दिल्लीत या भागात लग्नाची वरात विवाहस्थळाच्या दिशेने चाललेली असताना 25 वर्षीय नवऱ्या मुलावर दोन आरोपींनी गोळया झाडल्या होत्या. या गोळीबारात या मुलाच्या उजव्या हाताला गोळी लागली होती. त्यानंतर त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. तीन तासाच्या उपचारानंतर नवऱ्याने मंडपात येऊन विवाहाचे सर्व विधी पूर्ण केले होते.