योगी आदित्यनाथ (Photo Credit: PTI)

रविवारी हेलिकॉप्टरला पक्षी आदळल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या हेलिकॉप्टरचे वाराणसीमध्ये (Varanasi) आपत्कालीन लँडिंग (Emergency landing) करण्यात आले. हेलिकॉप्टरने वाराणसीतील रिझर्व्ह पोलिस लाइन्स ग्राऊंडवरून लखनौसाठी रवाना होत असताना ही घटना घडली.  प्राथमिक माहितीनुसार मुख्यमंत्री सर्किट हाऊसमध्ये परत आले. आता ते सरकारी विमानाने लखनौला रवाना होतील. वाराणसी येथून लखनौसाठी उड्डाण घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला पक्षी धडकला, त्यानंतर त्याला येथे उतरावे लागले, असे पीटीआयने जिल्हा दंडाधिकारी कौशलराज शर्मा यांच्या हवाल्याने सांगितले.

मुख्यमंत्री शनिवारी वाराणसीत आले होते आणि त्यांनी काशी विश्वनाथ मंदिरात दर्शन घेतले होते, तसेच विकासकामांचा आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला होता. वाराणसीमध्ये रात्रीचा मुक्काम केल्यानंतर रविवारी सकाळी ते लखनौला निघाले होते. याआधी शनिवारी आदित्यनाथ यांनी लखनौमध्ये स्वामीत्व योजनेअंतर्गत 11 लाख कुटुंबांना ऑनलाइन ग्रामीण निवासी हक्कांची कागदपत्रे वितरित केली. हेही वाचा Mann Ki Baat: 'मन की बात'मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'या' विषयी मांडले मत, मिताली राजचाही केला उल्लेख

लोक भवनाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात आदित्यनाथ यांनी कागदपत्रांचे वाटप केले आणि स्वावलंबी राज्य बनविण्यावर भर दिला. पुढील वर्षी ऑक्टोबरपर्यंत उत्तर प्रदेशातील गावांमध्ये राहणाऱ्या सुमारे अडीच कोटी लोकांना ही प्रमाणपत्रे मिळतील, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री म्हणाले की, 34 लाख लोकांनी या योजनेचा आधीच लाभ घेतला आहे, तर राज्यातील 1,10,300 महसुली गावांमध्ये ड्रोनद्वारे जमिनीचे सर्वेक्षण ऑगस्टपर्यंत पूर्ण केले जाईल.

अधिक लोकांना प्रमाणपत्रांचे वितरण जलद होईल, असे एका अधिकृत पत्रकात म्हटले आहे. दोन वर्षांपूर्वी देशभरात ग्रामीण निवासी रेकॉर्ड योजना सुरू केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त करताना, आदित्यनाथ म्हणाले की यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होईल आणि दीर्घकाळापर्यंत गावकऱ्यांना स्वावलंबी होण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.