University Final Year Exams: विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या युवासेना सह अन्य विद्यार्थ्यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Supreme Court | (File Image)

कोरोना संकटकाळात UGC ने विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा सप्टेंबर 2020 पर्यंत घेण्याच्या सूचना केल्यानंतर महाराष्ट्रात युवासेना सह देशभरातील विद्यार्थी, पालक, शिक्षकांनी आवाज उठवला आहे. आज याबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी आहे. दरम्यान कोरोना संकटकाळात परीक्षा रद्द करून सरासरी गुण देऊन विद्यार्थ्यांचा निकाल लावण्याची भूमिका महाराष्ट्र सरकारने घेतली आहे. तसेच सरकार या निर्णयावर ठाम आहे. याबाबत महाराष्ट्र सरकारकडून अ‍ॅफिडेव्हिड सादर करण्यात आले आहे. आता न्यायालय यावर काय सुनावणी करणार? याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान माहाराष्ट्रासह, दिल्ली, पंजाब सोबतच 13 राज्यांनी कोरोना संकटकाळामध्ये परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर युजीसीने दिलेल्या माहितीनुसार, देशातील 640 पैकी 454विद्यापीठांनी अंतिम वर्षाच्या, अंतिम सत्राच्या परीक्षा झाल्या आहेत. 31 जुलै दिवशी यावर शेवटची सुनवणी झाली होती. त्यावेळेस केंद्र सरकार, गृह मंत्रालयाला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते.

युजीसीच्या मते, पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना थेट पदवी दान करण्यापेक्षा त्यांच्या हिताच्या दृष्टीने ऑनलाईन, ऑफलाईन किंवा दोन्ही पर्यायांचा वापर करून विद्यापीठांनी 30 सप्टेंबर पर्यंत परीक्षा घ्याव्यात आणि विद्यार्थ्यांचा निकाल लावाव. मात्र महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारने जीआर काढत कोरोना परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात घालून परीक्षा घेणं योग्य नसल्याचं सांगत सरासरी गुण देत विद्यार्थ्यांचा अंतिम लावत असल्याचे तसेच ज्यांना अशा प्रकारे लावलेला निकाल मान्य नसेल त्यांना कोरोना संकट संपल्यानंतर पुन्हा परीक्षा देण्याची संधी दिली जाईल अशी माहिती दिली आहे.

दरम्यान राज्य सरकार आणि युसीजीमधील या वादामध्ये विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारामध्ये आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण पोहचले असून आज त्यावर सुनावणी होणार असून पुढील निर्णयाकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे.