शहरातील विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आता अखेर मुंबई विद्यापीठाने (Mumbai University) सेमिस्टर एंडच्या 10 ऑक्टोबर पासून सुरू होणार्या परीक्षा लांबणीवर टाकल्या असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. मंगळवार 4 ऑक्टोबरच्या सकाळी याबाबतचा निर्णय एका परिपत्रकाद्वारा जाहीर केला आहे. यामध्ये सार्या कोर्सच्या पहिल्या, दुसर्या आणि तिसर्या वर्षाच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
नवं वेळापत्रक अद्याप जाहीर केलेले नाही. लवकरच ते जारी केले जाईल. बोर्ड ऑफ एक्झामिनेशनच्या बैठकीमध्ये परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला आहे. आता या परीक्षा दिवाळी नंतर होण्याची शक्यता आहे.
परीक्षे साठी तयारी करायला पुरेसा वेळ मिळाला नसल्याचं 5 शहरातील विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाला कळवलं होतं. कोविड नंतर आता अभ्यासक्रम वाढवला आहे, विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव गेला आहे. या सार्याचा विचार करता वेळ कमी असल्याचं कारण देत विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती.
कोविडच्या काळात विद्यार्थी केवळ ऑनलाईन परीक्षा देत होते. अनेक प्रश्नावल्या या बहुपर्यायी उत्तराच्या होत्या. पण आता पुन्हा पहिल्याप्रमाणे परीक्षा द्याव्या लागणार असल्याने परीक्षेचं वेळापत्रक देखील जारी केल्यानंतर परीक्षेच्या कालखंडातील वेळ कमी होता.
मागील आठवड्यामध्ये सिनेट सदस्यांनी याबाबत आवाज उठवला होता. परीक्षा भवनाजवळ विद्यार्थी देखील गोळा झाले होते.