
State Common Entrance Test Cell अर्थात महाराष्ट्र सीईटी सेल कडून 27 एप्रिल ला घेण्यात आलेल्या सीईटीच्या पीसीएम ग्रुपच्या (PCM Group) परीक्षेत तांत्रिक त्रुटी आढळल्या होत्या. सकाळच्या सत्रामध्ये इंग्रजी माध्यमातील गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेत या त्रुटी असल्याने अनेकांनी तक्रारी नोंदवल्या होत्या. आता या तक्रारींची दखल घेत पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व विद्यार्थ्यांसाठी फेर परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. ही फेर परीक्षा दिनांक 5 मे 2025 रोजी होणार आहे, अशी माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने एका परिपत्रकाच्या माध्यमातून दिली आहे. इथे पहा सीईटी सेलचं परिपत्रक .
एमएचटी-सीईटी पीसीएम गटाची परीक्षा 19 एप्रिल ते 27 एप्रिल 2025 दरम्यान 15 सत्रांमध्ये 197 परीक्षा केंद्रांवर पार पडली. एकूण 4,64,263 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यापैकी 4,25,548 उमेदवारांनी परीक्षा दिली आहे.
महाराष्ट्रातील महाविद्यालयांमध्ये अभियांत्रिकी, फार्मसी आणि कृषी अभ्यासाच्या प्रवेशासाठी MHT-CET ही प्रवेश परीक्षा घेतली जाते. 27 एप्रिलला प्रामुख्याने सकाळच्या सत्रात इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेमध्ये 21 चूकीचे प्रश्न होते. चुका पीसीएम (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित) गटापुरत्या मर्यादित होत्या आणि त्या फक्त गणित विभागात आढळल्या, जे विशेषतः महत्त्वाचे आहे कारण गणिताच्या प्रश्नांना भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राच्या तुलनेत दुप्पट (प्रत्येकी २ गुण) महत्त्व असते.