देशात मंदीचे वातावरण असताना, भारतातील रोजगाराविषयी मोठी बातमी समोर आली आहे. माहिती तंत्रज्ञानातील (IT) एक प्रमुख कंपनी कॉग्निझंट टेक्नॉलॉजी सोल्यूशन्सने (Cognizant), यावर्षी ते भारतातून अधिक विद्यार्थ्यांना नोकर्या (Mega Recruitment) देतील असे जाहीर केले आहे. आयटी कंपनी कॉग्निझंट कॅम्पस हायरिंग (Campus Hiring) करणार आहे. याबाबत बोलताना, कॉग्निझंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रायन हम्फ्रीज म्हणाले की, 'विद्यापीठाचे अधिकाधिक विद्यार्थी डिजिटल पद्धतीने तयार होत असल्याने, आम्ही 2020 मध्ये अभियांत्रिकी आणि विज्ञान पदवीधरांच्या 30 टक्के भरतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
कंपनी भारतात अधिक तांत्रिक पदवीधर घेण्याचा विचार करीत आहे. नॅस्डॅक लिस्टेड कंपनीचे महाविद्यालय परिसरातून यावर्षी 20,000 विद्यार्थ्यांना रोजगार देण्याचे उद्दीष्ट आहे. याखेरीज कंपनीने अभियांत्रिकी पदवीधरांसाठी कॅम्पस पगाराची टक्केवारी, 18 टक्क्यांनी वाढवून 4,00,000 रुपये केली आहे. कॉग्निझंटच्या सीईओच्या मते, सुमारे 100 प्रीमियर इंजिनीअरिंग कॅम्पसमध्ये केलेल्या प्रस्तावांचे स्वीकृती दर 80 टक्क्यांहून अधिक आहे, ज्यामुळे कॉग्निझंटवरील आत्मविश्वास वाढला आहे.
जेव्हा कॉग्निझंटने जुलै ते सप्टेंबर 2019 मध्ये जागतिक स्तरावर 10,000 ते 12,000 कर्मचार्यांच्या छाटणीची घोषणा केली होती, अशावेळीच कॉग्निझंटमध्ये ही वाढ झाली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) नंतर गेल्या वर्षीपर्यंत 2 लाख कर्मचार्यांना नोकरी देणारी कॉग्निझंट ही दुसरी आयटी कंपनी बनली आहे. टीसीएस ही भारतातील आयटी क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असून कंपनीत एकूण 4.4 लाख कर्मचारी आहेत. (हेही वाचा: 2020 च्या नव्या वर्षात खासगी क्षेत्रात तब्बल 7 लाख नवीन नोकऱ्यांची संधी उपलब्ध होणार)
त्याचबरोबर डेलॉईट ग्लोबलचे सीईओ पुनीत रंजन यांनाही भारतीय बाजाराबद्दल आशा आहे. ते म्हणाले की, कंपनी तीन वर्षांत भारतीय बाजारात 75 हजार रोजगार देईल. सध्या भारतात कंपनीची कर्मचारी संख्या 50,000 आहे.