CET Maratha Reservation Issue: राज्यातील वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेत आरक्षणाच्या मुद्यावर सरकारने परिपत्रक काढून 25 मे पर्यंत मुदत वाढ देत असल्याचे म्हटले आहे. सरकारने परिपत्रक काढले असले तरीही विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत. सरकारने परिपत्रक काढून मुदतवाढ दिली. मात्र, या परिपत्रकातच घोळ असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. हे विद्यार्थी आता मुख्यमंत्र्यांचे सरकारी निवासस्थान वर्षा बंगल्यावर आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. आपल्या मागण्यांसाठी हे विद्यार्थी आझाद मैदान (Azad Maidan) येथे आंदोलन करत होते.
सरकारने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार, विद्यार्थ्यांच्या राज्यातील वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेला 25 मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे. तर याच पत्रकात सरकारने न्यायालयाच्या निर्णयाला आधीन राहूनच आम्ही हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. मात्र, आम्हाला मुदतवाढ हवी अशी आमची कधीच मागणी नव्हती. उलट आमचे आरक्षण कसे टिकेल आमचा मुद्दा निर्णायक पद्धतीने निकालात कसा निघेल याबाबत विचार करावा अशी आमची मागणी होती, असे आंदोलक विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, मुंबई: आझाद मैदान येथे मेडीकलच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन कायम, सरकारी आश्वासन केवळ अद्याप तरी कागदावरच)
दरम्यान, सरकारने हे परिपत्रक काढले. मात्र, आता प्रवेश प्रक्रिया अर्ज दाखल करण्यासाठी केवळ दोनच तास बाकी आहेत. त्यामुळे हे सर्व विद्यार्थी एकाच वेळी जर अर्ज दाखल करण्यासाठी ऑनलाईन प्रक्रियेचा वापर करु लागले तर, ती साईट कसा प्रतिसाद देईल हेही पाहावे लागेल. अनेकदा अशा वेळी सर्वर डाऊन होण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे सरकारच्या मनात आमच्या विषयाबद्दल काय आहे, हेच कळायला मार्ग नाही, अशी भावना काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
राज्यातील वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेत आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी मुंबईतील आझाद मैदान (Azad Maidan) येथ आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण (Maratha Reservation) रद्द करण्याच्या दिलेल्या निर्णयाने 250 वैद्यकीय विद्यार्थ्यांचे प्रवेश धोक्यात आले. त्यामुळे या मद्द्यावर तोडगा काढावा. यासाठी हे विद्यार्थी आक्रमक आहेत. यावर प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलण्याचे आश्वासन सोमवारी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी दिले. मात्र लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आझाद मैदानातून मागे हटणार नाही असा पवित्रा आंदोलक विद्यार्थ्यांनी घेतल्याने तिढा कायम राहिला आहे. तसेच, याबाबतचे नोटीफेशन लवकरच जारी करु असेही सराकरकढून सांगण्यात आले. मात्र, या प्रवेश प्रक्रिया पूर्ण होण्यास अवघ्या काही तासांचाच कालावधी शिल्लख असतानाही सरकारकडून कोणत्याही प्रकारचे नोटीफिकेशन प्राप्त झाले नाही. त्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.