Maratha Reservation: मराठा समाज विद्यार्थ्यांच्या मेडीकल पदव्युत्तर प्रवेश ( Medical PG student) प्रक्रियेचा तिढा सरकारच्या निर्णयामुळे सुटण्याची शक्यता वाटत असतानाच या तिढ्यातील गुंतागुंत अधिकच वाढणार असल्याचे दिसतंय. राज्य सरकार हा तिढा सोडविण्यासाठी अध्यादेश काढण्याचा विचार करत आहे. दरम्यान, त्याविरोधात खुल्या वर्गातील विद्यार्थी-पालक सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर प्रवेशासाठी अध्यादेश काढताना खुल्या वर्गातील वद्यार्थ्यांचाही विचार करावा अशी भावना या पालकांनी व्यक्त केली आहे.
काय आहेत खुल्या वर्गातील पालकांच्या मागण्या?
- विद्यार्थ्यांना एसईबी कोट्यातून प्रवेश देऊ नये
- हा प्रवेश देताना मेरीटनुसारच द्यावा
- सरकारने अध्यादेश काढत असताना खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी
- सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसारच प्रवेश प्रक्रिया सुरु करावी.
दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाची आज (शुक्रवार, 17 एप्रिल 2019) दुपारी बारा वाजता बैठक पार पडत आहे. या बैठकीत मराठा समाज मेडिकल पीजी प्रवेशाचा तिढा सोढविण्यावर विचार होणार आहे. हा तिढा सोडविण्यासाठी सरकार अध्यादेश काढणार आहे, अशी माहिती गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली होती. त्यामुळे आता या प्रश्नावर कसा तोडगा निघतो याबाबत उत्सुकता आहे.