महाराष्ट्रात मागील वर्षभरापासून सुरू असलेले कोरोना वायरस संकट अद्यापही शमण्याचं नाव घेत नाही. या संकटाचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षावरही परिणाम झाला आहे. दरम्यान पुन्हा कोरोना रूग्णांमध्ये वाढ होत असल्याने आता या वर्षी होणारी 5वी आणि 8वी इयत्तेची स्कॉलरशीपची परीक्षा (Maharashtra Scholarship Exams) पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर याची माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून पूर्वी 25 एप्रिल 2021 रोजी आयोजित केलेली परीक्षा आता नव्या वेळापत्रकानुसार 23 मे दिवशी होणार आहे.
दरम्यान महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे परीक्षेच्या तारखेमध्ये बदल करताना अर्ज दाखल करण्यासाठी देखील मुदतवाढ दिली आहे. पूर्वी शाळांना यंदाच्या स्कॉलरशीप परीक्षेसाठी 30 मार्च 2021 पर्यंत ऑनलाईन माध्यमातून अर्ज दाखल करण्यास मुदत होती पण आता त्यामध्ये वाढ करून ही मुदत 10 एप्रिल 2021 पर्यंत करण्यात आली आहे. ही अर्ज दाखल करण्यासाठी देण्यात आली दुसरी मुदतवाढ आहे. यावर्षी कोरोना प्रादुर्भाव पाहता शाळांना ऑनलाईन माध्यमातूनच अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. Maharashtra SSC HSC April 21 Modified Final Time Table: वाढीव वेळेनुसार यंदाच्या 10वी,12वी बोर्ड परीक्षांचं सुधारित वेळापत्रक जारी.
स्कॉलरशीप परीक्षेमध्ये भाषा, गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी अशा तीन विषयांच्या प्रत्येकी 100 गुणांच्या परीक्षा घेतल्या जातात. त्यानंतर राज्यभरातून अव्वल विद्यार्थ्यांची यादी जाहीर करून स्कॉलरशीप धारकांची यादी जाहीर केली जाते. यामध्ये प्रामुख्याने बहुपर्यायी प्रश्नावली असते. सार्या विषयांच्या परीक्षा एकाच दिवशी घेतल्या जातात.
मागील वर्षभरापासून ग्रामीण आणि शहरी भागांत शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांना केवळ ऑनलाईन माध्यमातून शिक्षण सुरू आहे. त्यामुळे शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांमध्येही या वर्षी अभ्यास करताना आणि शैक्षणिक वर्ष पूर्ण करताना मोठी कसरत करावी लागली आहे.