लखनऊ विद्यापीठात सुरु होणार 'गर्भसंस्कार' विषयावर कोर्स; मिळणार गरोदरपणात काय घालावे, काय खावे, कसे वागावे याचे प्रशिक्षण
Lucknow University (Photo Credits: IANS)

काही दिवसांपूर्वी हैद्राबाद येथील एक शैक्षणिक संस्था चर्चेत आली होती, जिथे एका आदर्श सून कशी असावी याबाबत प्रशिक्षण दिले जात होते. आता लखनऊ विद्यापीठ  (Lucknow University) हे, 'गर्भसंस्कार' (Garbh Sanskar) या विषयावर प्रमाणपत्र आणि डिप्लोमा कोर्स सुरू करणारे देशातील पहिले विद्यापीठ असेल. नवीन शैक्षणिक सत्रापासून विद्यापीठात हा कोर्स सुरु होणार आहे.

या कोर्स अंतर्गत विद्यार्थ्यांना गर्भवती महिला आणि त्यांच्या गर्भारपणाविषयी (Pregnancy) गोष्टी शिकविल्या जातील. विद्यापीठाच्या म्हणण्यानुसार फक्त स्त्रियाच नाही तर, पुरुष विद्यार्थीदेखील या कोर्ससाठी प्रवेश घेऊ शकतात.

गर्भधारणेदरम्यान स्त्रियांनी काय परिधान करावे, काय खावे, त्यांचे वर्तन कसे असावे, कोणत्या प्रकारचे संगीत त्यांच्यासाठी चांगले असेल आणि स्वत: ला तंदुरुस्त कसे ठेवता येईल याविषयीच्या गोष्टी या कोर्समध्ये शिकवल्या जातील. हा अभ्यासक्रम रोजगार निर्मितीसाठी देखील प्रभावी ठरेल असा दावा केला जात आहे. याबाबत बोताना विद्यापीठाचे प्रवक्ते दुर्गेश श्रीवास्तव म्हणतात, 'उत्तर प्रदेशचे राज्यपाल आनंदीबेन पटेल, ज्या राज्य विद्यापीठांच्या कुलगुरू देखील आहेत, यांच्या प्रस्तावानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांनी प्रशासनासमोर मुलींच्या माता म्हणून त्यांच्या संभाव्य भूमिकेसाठी प्रशिक्षित करण्याचा प्रस्ताव दिला होता.

गेल्या वर्षी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभावेळी, आनंदीबेन पटेल यांनी महाभारतातील योद्धा अभिमन्यूचे उदाहरण देऊन सांगितले होते की, त्याने आईच्या पोटात राहून युद्धकला शिकली. त्यांनी असा दावाही केला आहे की, जर्मनीतील एक संस्था असा कोर्स शिकवते. आता या कार्यक्रमासाठी एक मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आली आहे, ज्यामध्ये विद्यार्थी 16 मूल्यांविषयी शिकतील. या नवीन कोर्स अंतर्गत विविध कार्यशाळांचे आयोजन केले जाईल. (हेही वाचा: गरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' फळं; अन्यथा होईल मोठं नुकसान)

लखनऊ विद्यापीठाचे विद्यार्थी आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांनी हा नवीन कोर्स अतिशय उपयुक्त असल्याचे सांगितले आहे. विद्यापीठाचा विद्यार्थी संजीव म्हणतो, 'अभ्यासक्रम खरोखर चांगला आहे आणि आम्ही त्याचे स्वागत करतो. ही संवेदनशील समस्या आहे, जर विद्यार्थ्यांना मातृत्वाबद्दल प्रशिक्षण दिले गेले असेल तर ते जोडप्यांना निरोगी मूल जन्माला घालण्यास करण्यास मदत करतील. याचाच अर्थ आपल्या देशाचे भविष्य हे निरोगी आहे.'