Marathi Balbharati Old Books Download: बालभारती म्हटलं की अनेकांना आठवते ती आपली प्राथमिक शाळा. ते बालपण, सवंगडी आणि ना भविष्याची चिंता ना भूतकाळातील विचार. फक्त मनसोक्त जगलेला वर्तमान काळ. याच काळात झालेली अक्षरओळख. त्या ओळखीसाठी कारण ठरलेले महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ आणि त्याद्वारे शालेय अभ्यासक्रमासाठी प्रकाशित करण्यात आलेली पुस्तके. आजही ही पुस्तके मिळविण्यासाठी अनेकांची धडपड सुरु असते. काळानुरुप अभ्यासक्रम बदलत गेले असले तरी त्या काळातील बालभारती पुस्तके कोठे मिळतील? असे अनेक जण विचारतात. त्यांच्यासाठी ही माहिती महत्त्वाची ठरु शकते.
मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात 27 जानेवारी 1967 रोजी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ ही महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाअंतर्गत ही संस्था स्थापन करण्यात आली. जी बालभारती नावाने ओळखली जाते. ही संस्था शालेय अभ्यासक्रमासाठी पाट्यपुस्तके बनविण्याचे काम करते. विद्यार्थ्यांना कमी वेळात, योग्य दरात आणि गुणवत्तापूर्ण पुस्तके उपलब्ध करुन देणे या संस्थेचे प्रमुख उद्दीष्ट आहे. त्यासाठी ही संस्था मुद्रण आणि वितरणाची व्यवस्था करते. संस्थेचे मुख्य कार्यालय पुणे येथे असून औरंगाबाद आणि नागपूर येते तिची विभागीय कार्यालये आहेत.
बालभारती पुस्तके कोठे मिळतील?
बालभारती पुस्तके सालाबादप्रमाणे उपलब्ध होणे तसे काहीसे कठीण आहे. परंतू, त्यासाठी बालभारतीने डिजिटल युगाचा आधार घेतला आहे. ज्यामुळे ही दुर्मिळ पुस्तके आपणास सहज उपलब्ध होऊ शकतात. त्यासाठी आपल्याला इंटरनेटचा वापर करावा लागेल. इंटरनेटवर e-Balbharati संकेतस्थळाला भेट द्या. इथे तुम्हाला विविध भाषेतील शालेय पुस्तके पाहायला मिळतील. इथे तुम्हाला बालभारती अर्काईव्ह पर्यायावर क्लिक करावे लागेल. या पर्यायावर क्लिक करताच एक विंडो ओपन होईल. इथे तुम्हाला हव्या असलेल्या पुस्तकासाठी शैक्षणिक वर्ष, वर्ग, विषय आणि भाषा निवडा आणि सर्च करा. तुम्हाला हवे ते पुस्तक डाऊनलोड करता येऊ शकेल.