Badlapur Police Station | (Photo Credit- X)

अल्पवयीन मुलीवर शाळेत झालेल्या लैंगिक अत्याचाराची घटना पुढे येताच बदलापूर (Badlapur Sexual Assault) येथे तणाव निर्माण झाला आहे. संतप्त पालकांनी  आदर्श विद्यालय शाळेवर मोर्चा काढला आणि फाटकावर निदर्शनेही केली. बराच काळ उलटला तरी शालेय प्रशासनाकडून कोणीही पालकांशी संवाद साधण्यासाठी आले नाही. त्यामुळे पालकांच्या संतापात अधिक भर पडली. संतप्त पालक फाटकातून शाळेच्या इमारतीत घुसले आणि त्यांनी तोडफोड (Badlapur School Vandalized) केली. दरम्यान, काही पालकांनी बदलापूर रल्वेस्थानकात आंदोलन केले आणि रेल रोको देखील केला. चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्यास फाशी द्या, अशी मागणी संतप्त नागरिक करत आहेत.

पालकांच्या संतापाचा बांध फुटला

संतप्त पालकांनी बदलापूर रेल्वे स्टेशन आणि शालेय परिसरात आंदोलन सुरु केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी हजेरी लावली. दरम्यान, पालकांच्या संतापाला बांध राहिला नाही. त्यांनी शालेय आवारात घुसून तोडफोड केली. नागरिकांच्या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले. बदलापूर स्थानकातील आंदोलनादरम्यान, शांततेचे अवाहन करणाऱ्या पोलिसांवरही दगडफेक झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पालकांचा संताप इतका अनावर झाला की, त्यांनी शाळेचे फाटक तोडून आवारात प्रवेश केला. (हेही वाचा, Badlapur Minor Sexual Assault Case: बदलापूर येथे अल्पवयीन शालेय मुलीवर लैंगिक अत्याचार, व्हायरल पोस्टनंतर खळबळ)

मुख्याध्यापक निलंबीत, सेविका बडतर्फ

पालकांचा संताप तीव्र झाल्यानंतर शालेय प्रशासनाला जाग आली. प्रशासनाने शाळेच्या मुख्याध्यापक महिलेस निलंबीत केले आहे. तर, मुलांच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या दोन सेविकांना सेवेतूनच कमी करण्यात आले आहे. शाळेने ही कारवाई केल्याचे सांगितले असले तरी, पालकांचा संताप कमी झाला नाही. उलट त्यात वाढच होत आहे. अत्याचार करणाऱ्या नराधमास फाशी द्यावी अशी मागणी नागरिक करत आहेत.  (हेही वाचा:Badlapur: बदलापूरमध्ये शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार प्रकरणी संतप्त नागरिकांचा शाळेच्या गेटवर मोर्चा )

एक्स पोस्ट

दरम्यान, अत्याचार पीडित मुलीच्या आईवडीलांनी घडल्या प्रकाराबद्दल शाळेला कळवले होते. मात्र, पालकांनी तक्रार देऊन आणि बाबी कानावर घालूनही शाळा प्रशासनाने कोणतीही हालचाल अथवा कारवाई केली नाही. एका राजकीय पदाधिकाऱ्याने आपल्या सोशल मीडिया मंच X वरुन पोस्ट केल्यानंतर घडल्या प्रकाराला वाचा फुटली. शिवसेना (UBT) पदाधिकारी अॅड. जयेश वाणी यांनी सोशल मीडियावर या प्रकरणाबद्दल पोस्ट लिहीली होती. ही पोस्ट अल्पावधीतच व्हायरल झाली आणि घडल्या प्रकाराबद्दल माहिती पुढे आली. वाणी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “ए आई मला शुच्या जागी मुंग्या चावताहेत..” हे वाक्य एका 3 वर्षे 8 महिन्याच्या मुलीचं.. आईने दवाखान्यात नेल्यावर कळालं की, शाळेतल्या अक्षय शिंदे नावाच्या “दादा” ने चिमुरडीच्या अजाणतेपणाला त्याच्या वासनेचं बळी बनवलं. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये शाळेने घडला प्रकार कळूनदेखील कोणतीही हालचाल केली नसल्याचा आरोप केल होता.